किनवट येथे ज्वारी,मका खरेदी केंद्रांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:12+5:302021-04-17T04:17:12+5:30
महाराष्ट्र शासननिर्णयानुसार राज्यातील आदिवासी क्षेत्रामधील भरड धान्य खरेदी करण्याकरिता त्याच भागात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात येत असतात परंतु कोरोनाच्या ...
महाराष्ट्र शासननिर्णयानुसार राज्यातील आदिवासी क्षेत्रामधील भरड धान्य खरेदी करण्याकरिता त्याच भागात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात येत असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बहुल किनवट तालुक्यातील केंद्रांना मंजुरी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत होती अखेर तालुक्यातील जलधारा आणि चिखली येथील खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता राज्य शासनाने नेमणूक केलेल्या अभिकर्ता संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या वतीने प्रादेशिक व्यवस्थापक , तसेच प्रादेशिक कार्यालय, यवतमाळ यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे या खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे .
राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता खरेदी केंद्रावर सुरक्षितरित्या खरेदी होण्यासाठी सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण आणि अन्य बाबींच्या अधीन राहून खरेदी केली जाणार आहे. किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका आणि ज्वारी पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे याभागात आदिवासी विकास महामंडळाच्या अधीन राहून १९ एप्रिलपासून ऑनलाईन खरेदी करण्यात येणार आहे १ मे ते ३० जून २०२१ दरम्यान प्रत्यक्ष खरेदी करण्यात येणार आहे . भरड धान्याच्या खरेदीकरिता शासनाने आधारभूत किंमत निश्चित केली आहे. ज्वारी (संकरित) करिता प्रतिक्विंटल २६२० रु. ज्वारी (मालदांडी) करिता २६४० रु. प्रतिक्विंटल तर मका पिकासाठी १८५० रु प्रतिक्विंटल दर ठरवून दिल्याची माहितीही खा. पाटील यांनी दिली.