लातूर/नांदेड/हिंगोली : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बी.कॉम. तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरू असून, शुक्रवारी अंकेक्षण-२ (आॅडीटींग-२) या विषयाची सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होती. मात्र परीक्षार्थ्यांना पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला. नांदेड, लातूरसह विद्यापीठाच्या कक्षेतील सर्वच केंद्रांवर हा प्रकार घडला. दरम्यान, तब्बल दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली.
‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत बी.कॉम. तृतीय वर्षाच्या आॅडिटिंग-२ या विषयाची सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होती. मात्र त्यांना पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली. हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधितांना ही माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाने दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून दिली. दरम्यानच्या काळात परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. विशेष म्हणजे बदलून दिलेल्या प्रश्नपत्रिकेतही शेवटचा प्रश्न ५ व्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरच विचारला होता. शिवाय, प्रश्नपत्रिकेत अनेक चुका होत्या, असेही परीक्षार्थींनी सांगितले. या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
हिंगोलीतही विद्यार्थ्यांचा गोंधळविद्यापीठाच्या बी.कॉम तृतीय वर्षाच्या परीक्षार्र्थींना जुनीच प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तब्बल तासाभरानंतर विद्यापीठाला चूक उमजली. त्यानंतर नवी प्रश्नपत्रिका पाठवून नव्याने परीक्षा घेण्याची सूचना परीक्षा केंद्रांना केली. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दोन वेळा पेपर सोडविण्याची वेळ आली.
विद्यार्थ्यांचे नुकसान नाही वाणिज्य शाखेच्या सहाव्या सत्राच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सिलॅबसबाहेरचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने दुसरा प्रश्नपत्रिका संच देण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी पहिल्या संचावरच परीक्षा देणार असल्याचे सांगत तीच प्रश्नपत्रिका वापरली. ज्यांनी दुसरा संच घेतला त्या विद्यार्थ्यांना नियमानुसार वेळ वाढवून दिला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे कसलेही नुकसान झाले नाही.- रवि सरोदे, परीक्षा नियंत्रक, स्वारातीम