जिद्द अन् परिश्रमाच्या बळावर अनाथ गणेश होणार डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:57 AM2019-07-15T00:57:17+5:302019-07-15T00:59:17+5:30
अनाथ असल्याचे समजल्यानंतर भावनिक अन् सामाजिक भावनेतून मदतीसाठी पुढे आलेल्यांचा विश्वास गणेशने सार्थ ठरवला आहे. नीट परीक्षेत गुण घेत तो एमबीबीएससाठी पात्र ठरला असून पहिल्याच यादीत केईएममध्ये गणेशचा नंबर लागला आहे.
श्रीनिवास भोसले।
नांदेड : अनाथ असल्याचे समजल्यानंतर भावनिक अन् सामाजिक भावनेतून मदतीसाठी पुढे आलेल्यांचा विश्वास गणेशने सार्थ ठरवला आहे. नीट परीक्षेत गुण घेत तो एमबीबीएससाठी पात्र ठरला असून पहिल्याच यादीत केईएममध्ये गणेशचा नंबर लागला आहे.
मूळचे आंध्र प्रदेशातील व्यंकट चव्हाण यांनी उदरनिवार्हासाठी आपल्या कुटुंबीयासह नांदेड जिल्ह्यातील भोकर गाठले. शिक्षणाचा अभाव आणि ओळखी नसल्याने चव्हाण कुटुंब मोलमजुरी करून पोट भरत होते. मात्र, २००५ मध्ये काळाने झडप घातली.
व्यंकट चव्हाण यांचे २००५ मध्ये आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या गणेश आणि लक्ष्मी या दोन चिमुकल्यांना घेऊन व्यंकट यांच्या पत्नीने मोलमजुरी करून कधी उपाशीपोटी राहून मुलांचा सांभाळ केला. मात्र त्याही आजाराने ग्रस्त झाल्याने २०१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. गणेश आणि लक्ष्मी या दोन्ही चिमुकल्यांचे आईचे छत्रही हरपले. व्यंकट चव्हाण यांच्याकडे घर, प्लॉट अशी कोणतीही संपत्ती नव्हती. आईचेही निधन झाल्याने दोन्ही चिमुकले उघड्यावर पडल्याचे पाहून भोकर येथील कैलास राठोड यांनी माणुसकीचा धर्म निभावत गणेश आणि लक्ष्मी या दोन्ही मुलांना आपल्या घरी आणून ठेवत त्यांना मायेचा आधार दिला. गणेशने इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत भोकर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. भोकर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण गायकवाड यांची भेट झाल्यानंतर त्यांनीही गणेश आणि लक्ष्मी या दोन्ही भावंडांना वेळोवेळी मदत देत आधार दिला.
त्यानंतर किनवट तालुक्यातील बोधडी येथील साई समर्पण संकल्प (एसएसएस) सेवाभावी संस्थेचे रेड्डी, सुनील चव्हाण, बालाजी थळगे, पचनुरे आदींचीही भेट झाली. २०१३ पासून गणेशच्या परिवारात दोन्ही भावंडांशिवाय कोणीच नातेवाईक नसल्याने वेळोवेळी त्यांना आर्थिक मदत केली. गणेशची बहीण लक्ष्मी ही सध्या नांदेड येथील सुमन बालगृहात इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
आजच्या काळात भरमसाठ डोनेशन भरून खाजगी शाळात शिक्षण, खाजगी शिकवणी यासह इतर अभ्यासासाठी सर्वच सुविधा उपलब्ध करून देऊनही अनेक मुले शिक्षण घेत नाहीत. मात्र गणेशने कधीकधी उपाशीपोटी राहूनही शाळेचा संकल्प सोडला नाही. त्यामुळे त्याने १० वीला ९२ टक्के गुण प्राप्त करून भोकर जिल्हा परिषद शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला.
लातूर येथील राजर्षी शाहू विद्यालयात गणेशला अनुदानित असलेल्या एकमेव जागेवर मोफत प्रवेश मिळाला. सदर प्रवेशासाठी नांदेड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. शिंगणे यांच्या वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारामुळे आणि शिक्षक नारायण गायकवाड आणि त्यांच्या चमूच्या पाठपुराव्यामुळे गणेशला राजर्षी विद्यालयात प्रवेश मिळाला.
गणेशला तेथे ११ वी १२ वीसाठी निवास, भोजन आणि शाळेतील शिक्षण हे पूर्ण मोफत असल्याने त्याला इतर खचार्साठी तसेच त्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी वाकोडे पाटील क्लासेसचे संचालक वाकोडे पाटील, बालाजी रेड्डी, बालाजी पचनुरे, साहेबराव यमलवाड, बालाजी कमटलवार, नारायण गायकवाड, एन. जी. पोतरे आदींनी रोख २१ हजार रूपयांची आर्थिक मदत केली.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत लागल्यास वाकोडे पाटील व महिला बालविकास अधिकारी शिंगणे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. गणेशने अवघ्या १४ व्या वर्षी आत्मचरित्र लिहिले असून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
गणेशने उपाशीपोटी राहून १० वीला घेतले ९२ टक्के
किनवट तालुक्यातील बोधडी येथील साई समर्पण संकल्प (एसएसएस) सेवाभावी संस्थेचे रेड्डी, सुनील चव्हाण, बालाजी थळगे, पचनुरे आदींचीही भेट झाली. २०१३ पासून गणेशच्या परिवारात दोन्ही भावंडांशिवाय कोणीच नातेवाईक नसल्याने वेळोवेळी त्यांना आर्थिक मदत केली. गणेशची बहीण लक्ष्मी ही सध्या नांदेड येथील सुमन बालगृहात इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे. गणेशने कधीकधी उपाशीपोटी राहूनही शाळेचा संकल्प सोडला नाही. त्यामुळे त्याने १० वीला ९२ टक्के गुण प्राप्त केले़