सेल्फी जीवावर बेतली; मामा-भाचीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 05:59 PM2021-06-15T17:59:59+5:302021-06-15T18:01:33+5:30
जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.
नांदेड- विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील काळेश्वर मंदिर परिसरात गोदावरीकाठी सेल्फी घेत असताना पाय घसरून नदीत पडलेल्या आपल्या भाचीला वाचविण्यासाठी गेलेल्या मामाचा व भाचीचा दोघांचाही गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
नवीन नांदेडातील वसरणी येथील सांची चंद्रकांत बनसोडे (१६) व तिचा मामा बुद्धप्रित पांडूरंग कीर्तने (वय ३८, रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) हे १३ जून रोजी सायंकाळी विष्णूपुरी प्रकल्प, श्री काळेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेले होते. काळेश्वर मंदिर परिसरात सांची बनसोडे ही सेल्फी घेत होती. त्यावेळी तिचा पाय घसरून ती गोदावरी नदीपात्रात पडली. सांची गोदावरी नदी पात्रात पडल्याचे पाहताच बुद्धप्रित कीर्तने यांनी तिला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, ते दोघेही पाण्यात बुडाले. ही बाब लक्षात घेताच प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केला. जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राहुल कीर्तने यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.