पावसाळ्यात सापांपासून सावधान... नांदेड जिल्ह्यात आढळतात १८ ते २० जातींचे साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:02+5:302021-06-16T04:25:02+5:30
साप आढळला तर्............. शेती, घर अथवा परिसरात साप आढळल्यास घाबरु नका. शांत रहा, त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. ...
साप आढळला तर्.............
शेती, घर अथवा परिसरात साप आढळल्यास घाबरु नका. शांत रहा, त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. सर्पमित्र येईपर्यंत साप नेमका कुठे जात आहे? यावर लक्ष ठेवावे. लहान मुले, पाळीव प्राणी यांना सापापासून दूर ठेवावे. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नये. अशा वेळेस साप चिडून हल्लाही करु शकतो. अचानक पुढे साप आल्यास स्तब्ध उभे रहावे. शक्य असल्यास जवळ असलेली वस्तू सापाच्या बाजूला फेकावी . जेणेकरुन तो त्या वस्तूकडे आकर्षित होईल.
साप चावला तर.....
पावसाळा सुरू झाला की, मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. यातून सर्पदंशाच्या घटनाही होतात. शेतामध्ये ही साप आढळत असतात. सर्पदंश झाल्यास प्रथमतः साप विषारी आहे की बिनविषारी याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. विषारी सापाने चावा घेतला असल्यास चावलेल्या जागी दाताचे व्रण असतात. साप चावलेल्या वरच्या बाजूस घट्टपट्टीने बांधावे. मांत्रिक, तांत्रिकाकडे न जाता थेट जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे.
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप...............
जिल्ह्यात धामण, कवड्या, तस्कर, धुळनागिण, नानेटी, बेरुळा आदी प्रकारचे बिनविषारी साप आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने धामण ही सर्वाधिक नजरेस पडणारा सापाचा प्रकार आहे. पिवळ्या रंगाचा व थोडासा जाडसर आकाराचा धामण सर्वत्र आढळतो. त्याचवेळी कवड्या साप ही आढळतो. पाण्यामध्ये विरुळ साप असतो. तो बिनविषारी असतो. त्यापासून कोणताही धोका नसतो. बिनविषारी साप माणसाची चाहूल लागताच लपण्याचा प्रयत्न करतो.
सर्प मित्राचा कोट----------
परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता सर्प मित्रांशी संपर्क साधावा. सापाच्या जवळ जाण्याचा, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नये. अशावेळी साप चिडून हल्ला करीत असतो. पावसाळ्यात घराजवळील परिसर स्वच्छ ठेवाव्यात. घराच्या भिंती व कुंपणाला असलेले छिद्र बुजवावेत. सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता दूर ठेवाव्यात. सर्पदंश झाल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे व उपचार घ्यावेत.
- प्रसाद शिंदे, सर्पमित्र
विषारी सापाचे प्रकार
नाग- जिल्ह्यात नाग हा प्रमुख विषारी साप आहे. धोक्याची थोडीही चाहूल लागताच नाग फना काढतो. त्या फन्यावर व्ही आकाराचे चिन्ह असते. टायर, ट्यूबमधून पंक्चर सारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे, असे समजावे. नागापासून नेहमीच सावध रहावे.
मन्यार- जिल्ह्याची काळपट, निळसर रंगाचा मन्यार ही अत्यंत विषारी असतो. त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. शेपटीकडील भागात अधिक आणि डोक्याकडे कमी असतात. हे साप इतर सापांना खात असतो.
फुरसे- साधारणता फुटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टीसारखे नक्षीकाम, डोक्यावर बाणासारखी खूण असलेले फुरसे विषारी असतात. फुरसे दंश करताना जिलेबी सारखा शरीराचा आकार करुन करवतीसारखा करकर आवाज करतो.
घोणस- जिल्ह्यात आढळणाऱ्या विषारी सापातील घोणस ही सर्वत्र आढळतात. हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे ठिपके व रेषा असतात. डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते. घोणसच्या दंशाने माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.