नांदेड : बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे शाळेतील शिक्षकांनी सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना तसे पत्र पाठविले आहे़ या प्रकरणातील दोषी मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे़
शंकरनगर येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना दोन महिन्यापूर्वी घडली आहे़ याबाबत पीडितेच्या आईने मुख्याध्यापकाकडे तक्रार करुनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला़ शिक्षक रसूल सय्यद, दयानंद राजूळे यांनी हे कृत्य केले असून मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य शेळके आणि स्वंयपाकी रेखाबाई बनसोडे यांनी हे प्रकरण दडविण्यासाठी पीडितेच्या आईकडून शपथपत्र लिहून घेतले़ पीडितेची आई मुलीच्या आईचा अशिक्षितपणा पाहून शिक्षकांनी बॉन्डवर शपथपत्र लिहून घेतले़ तसेच त्याची नोटरी देखील केली़ याबाबत नोटरीचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी़ संबंधित आरोपींना मदत करणाऱ्या मुख्याध्यापक, पदाधिकारी यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा़ तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित मुलीला मदत मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़नीलम गोऱ्हे यांनी लोहिया यांना केल्या आहेत़
राजकीय दबावाचा वापरमागासवर्गीय मुलीवर जिच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, आई मोलमजुरी करते अशी सर्व पार्श्वभूमी माहीत असलेल्या दोन शिक्षकांनी अत्याचार केला़ आज ती पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे़ या प्रकाराला वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न केला़ परंतु राजकीय दबाव वापरत हे प्रकरण दडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ -रामचंद्र भरांडे, लोकस्वराज्य आंदोलन