बिलोली तालुक्यात शिक्षकांचे पगार परस्पर उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:41 AM2019-03-15T00:41:31+5:302019-03-15T00:41:57+5:30
बिलोली तालुक्यातील बिजूर येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी परस्पर उचलून अपहार केल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.
नांदेड : बिलोली तालुक्यातील बिजूर येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी परस्पर उचलून अपहार केल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.
बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ बिजूर या संस्थेच्या अशोक प्राथमिक विद्यालय कुंडलवाडी, सत्य साईबाबा प्राथमिक विद्यालय बिलोली आणि प्राथमिक शाळा बिजूर अशा तीन शाळा आहेत. या शाळामधील शिक्षकांचे त्यांना मिळणारे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी जमा न करता शिक्षकांच्या सदर पगाराची रक्कम परस्पर उचलून शिक्षकांची फसवणूक केली आहे. याचे पुरावे संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागाकडे असल्याचे नमुद करीत सदरची बाब गंभीर दखलपात्र गुन्हा असल्याने या प्रकरणी आपले स्तरावरुन संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याबाबत आदेश देण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षकांना दिली आहे.
सदर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेला शिक्षक हा स्वत: पोलिस ठाण्यात फिर्याद देवू शकतो. तो त्याचा अधिकार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाची फिर्याद घेवून गुन्हा दाखल करावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिका-यांनी बिलोली गटशिक्षण अधिका-यांना संबंधित शाळामध्ये जावून शिक्षकांची हजेरीपत्रकावर नाव व सही घेवून त्यांना कार्यभार देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. संस्थेच्या तिन्ही शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक व संस्थाध्यक्ष हे हजेरी पटावर सही करु देत नाहीत. त्यांना शिकविण्याचा कार्यभार देत नाहीत. त्यांचे वेतन काढत नाहीत. याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाने यापूर्वीही आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे नमुद करीत गटशिक्षणाधिका-यांनी आता स्वत: ही कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिका-यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
प्रशासक नियुक्तीचीही केली शिफारस
सदर शिक्षण संस्था व संचालक शासनाच्या नियम व कायद्यानुसार काम करीत नाहीत. या पदाधिका-यांकडून शिक्षण खात्याने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. याबरोबरच संस्थेतील गैरकारभार व गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात असल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरुन स्पष्ट होत असल्याचे नमुद करीत सदर संस्था व शाळेचा कारभार नियमाप्रमाणे चालविण्यासाठी या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची शिफारस वजा विनंती शिक्षणाधिकाºयांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.