भारत दाढेल ।नांदेड : भाग्यनगर कॉर्नरवर दहा बाय पाच फुटांच्या छोट्या दुकानात फाटक्या कापड्यांना रफू करणाऱ्या व आर्थिक परिस्थितीसोबत संघर्ष करणा-या महंमद इस्माईल शेख अहेमद यांच्या बोटांना सुवर्णाक्षरांचे वरदान लाभले आहे़ पावती लिहून देताना त्यांच्या बोटातून मोत्यासारख्या अक्षरांची उधळण होताना ग्राहकही अचंबित होतात़भाग्यनगर चौकात कैलासनगर रस्त्यावर टपरीवजा आयडीएल रफू सेंटर तसे कोणाच्याही एकदम लक्षात येत नाही़ मात्र मागील ३० वर्षांपासून याच जागेवर रफूचे काम करणारे ५५ वर्षीय इस्माईल शेख हे आपल्या सुंदर हस्ताक्षराने ओळखले जातात़ हातात सुई, दोरा घेवून पोटाची खळगी भरणा-या इस्माईल शेख यांच्या उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधऩ १९८४ मध्ये बी़ कॉम़ पर्यंत शिक्षण घेतलेल्या इस्माईलभाई यांना नोकरीने अनेकदा हुलकावणी दिली़ त्यामुळे त्यांच्या जगण्याला वेदनेची किनार लाभली़सातवीत शिकत असतानाच त्यांना कर्सू लिपीचा छंद लागला़ दवाखान्यात असलेल्या डॉक्टरांच्या पदवी प्रमाणपत्रावरील वळणदार अक्षरे पाहून आपणही असे अक्षर काढण्यास शिकले पाहिजे, असा विचार करून त्यांनी दहावीपर्यंत अविरत प्रयत्न केले़ त्यांच्या सुंदर अक्षरांची चर्चा सर्वत्र होवू लागली़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम पदवीदान समारंभातील पदवी प्रमाणपत्र लेखनाचे काम त्यांना मिळाले़ मात्र दुदैवाने ते तिथे पोहोचू शकले नाहीत़ पुढे विद्यापीठात पदवी प्रमाणपत्र लेखनासाठी स्वतंत्र जागा भरण्यात आली़ १९९० मध्ये पोलीस अधीक्षक हसन मुश्रीफ यांनी माझे अक्षर पाहून मला पोलीस भरतीसाठी घरी पत्र पाठविले़ मात्र ते पत्र दुस-याच ठिकाणी पोस्टमनने दिले़ त्यामुळे हीसुद्धा नोकरी माझ्या हातातून गेली़ खाजगी शाळेवरील मिळालेली नोकरीही गरिबीमुळे करता आली नाही़सुई-दो-याची साथमाळटेकडी परिसरातील लक्ष्मीनगर या ठिकाणी राहणारे इस्माईल भाई हे दररोज आठ कि़ मी़ अंतर कापून भाग्यनगर कॉर्नर येथील आपल्या सायकलवर दुकानात येतात़ पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा त्यांचा परिवाऱ मात्र कष्टावर श्रद्धा असलेल्या इस्माईल भाई यांनी आपले ओझे मुलावरसुद्धा होवू नये, यासाठी सुई,दोºयाचे नाते कायम ठेवले आहे़जगण्यासाठी सुई-दो-यानेच साथ दिल्याचे ते म्हणाले.
फाटलेले आयुष्य जोडतोमाझ्या अक्षरांचे कौतुक अनेकांनी केले़ मात्र या कौतुकाने माझ्या पोटाचा प्रश्न सुटू शकला नाही़ तत्कालीन जिल्हाधिकारी रामानंद तिवारी यांनी माझे अक्षर पाहून माझ्या पाठीवर थाप मारली होती़ परंतु या शाबासकीचा उपयोग मला झाला नाही़ पदवीपर्यंत शिक्षण व टाईपिंग करूनसुद्धा नोकरी मिळाली नाही़ फार मोठे नव्हे तर साधा लिपिक होण्याचे माझे स्वप्न होते़ मात्र तेही पूर्ण झाले नाही़ खिशाला असलेली फाऊंटन पेन माझ्या वेदनेचे प्रतीक आहे़ ज्या बोटांतून सुंदर अक्षरे लिहिली जातात, तीच बोटं आज सुई-दोरा घेवून माझे फाटलेले आयुष्य शिवतात. - महमंद इस्माईल शेख