आली दिवाळी; गुजरात, तेलंगणाच्या पणत्या नांदेडच्या बाजारपेठेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:14 PM2020-11-03T19:14:10+5:302020-11-03T19:15:50+5:30
कोजागिरी पौर्णिमेपासून बाजारपेठ बहरण्यास सुरूवात झाली आहे.
नांदेड : कोजागिरीचा चंद्र दुधात पाहून झाला की, हळूच गारव्याची चाहूल लागते. रात्रीच्यावेळी चंद्रप्रकाशाने न्हावून निघालेल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची उधळण मनाला प्रसन्न करून जाते. अशा उत्साही वातावरणात दिवाळीच्या आगमनाची तयारी सुरू होते. बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपोत्सवाची लगबग बाजारपेठेत सुरू झाली असून यंदा गुजरात, आंध्र, तेलंगणा या राज्यातील पणत्यांचे नांदेडच्या बाजारात आगमन झाले आहे. गतवर्षीच्या भावात यंदा २० टक्के भाववाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
यावर्षीची दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी हाेत आहे. मागील सात- आठ महिन्यांपासून बंद असलेली व्यापारपेठ हळूहळू सुरू झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करीत नागरिकांनी कोरोनाशी लढा दिला आहे. मागील सर्वच सणोत्सव साजरे करण्यापासून लोकांना वंचित रहावे लागले. मात्र, आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तोंडावर आलेला दिवाळीचा सण नवा उत्साह घेवून आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण होत आहे. मागील सात महिन्यांपासून बंद असलेला व्यापार वाढत आहे. त्यातच कोजागिरी पौर्णिमेपासून बाजारपेठ बहरण्यास सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हणजे, लक्ष लक्ष दिव्यांचा सण. त्यासाठी नांदेडच्या बाजारपेठेत आकाशकंदिल व पणत्यांचे आगमन झाले आहे. गुुजरात, आंध्र, तेलंगणा या राज्यांसह सोलापूर व इतर शहरांतून पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विक्रेत्यांनी वर्कशॉप, श्रीनगर, तरोडानाका, जुनामोंढा, आदी ठिकाणी पणत्यांची दुकाने थाटली आहेत.
कोरोनामुळे पणती व्यवसायावर झाला परिणाम
कोजागिरीपासून पणत्यांची दुकाने शहरात लावले असून मोठ्या पणत्या ६० रूपये डझन तर लहान पणत्या ४० रूपये डझन याप्रमाणे विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के भाववाढ झाली असल्याचे पणती विक्रेते रूपेश कुमार यांनी सांगितले. तर कोरोनामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे कुंभार समाजाच्या विक्रेत्यांनी सांगितले.