कुंटूर : वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे. आपल्या महामानवाचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी दुसऱ्या महामानवाला कमी लेखले जात आहे. हे समाजासाठी, माणसांसाठी घातक आहे. कोणत्याही जातींच्या संघटना या त्या त्या जातीसाठी कितीही हितकरी भासत असल्यातरी त्या विनाशकारी आहेत. महामानवाची वाटणी तर परवडणारी नाहीच, असे प्रतिपादन अ.भा.साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष तथा विचारवंत लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.ते कुंटूर येथे पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, प्रतिष्ठान कुंटूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ व्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बोलत होते.ते म्हणाले की, ग्रामीण साहित्यिकांनी ग्रामीण भागातील समस्यांना उजागर करणारे, ग्रामीण अर्थशास्त्राची पुनर्मांडणी करण्यासाठीची मानसिकता ग्रामीण माणसात निर्माण करणारे लेखन केले पाहिजे. ही मानसिकता निर्माण करण्यासाठी हे संमेलन आणि कुंटूरचे युवक धडपडत आहेत, हे पाहून मला समाधान वाटते आहे, अशी नोंद केली.यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखकाचे प्रामाणिक लेखन हीच एक आंदोलनात्मक कृती असते, त्यामुळे लेखक कृतिशील आंदोलनात उतरत नाहीत म्हणून तक्रार करण्यात काही तथ्य नाही असे ते म्हणाले. पुढे बोलताना ग्रामीण भागात अभिरुची संपन्न वाचक घडवण्यासाठी गंभीर स्वरुपाची शिबिरे घेण्याचे आवाहन केले.यावेळी सर्वधर्मसमभाव विचारपीठावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश देशमुख कुंटूरकर, शिक्षणतज्ज्ञ, डॉ. सुरेश सावंत, सूर्यकांत पा. कदम, शिवाजी पा. होळकर, बाबूराव आडकिने, सूर्याजी चाडकर, बालाजीराव पवार, रुपेश कुंटूरकर, सौ़सबनीस आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या समारंभात वाचनालयाचे पुरस्कार संदीप ठाकरे, दत्ता डांगे, वसंत सुगावे, संजयसिंह राजपूत, दा.मा. बेंडे, डॉ. अनंता सूर यांना प्रदान करण्यात आले.स्वागताध्यक्ष मारोतराव कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. तर या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. बाळू दुगडूमवार यांनी केले तर विनोद झुंजारे यांनी व्यक्त आभार मानले. संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडी व भाषावारीने झाली. दुपारी परिसंवादात शिवाजी आंबुलगेकर यांनी संत साहित्यातील बोली या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.त्यानंतर विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिता यलमाटे, बालाजी पेठेकर यांचे बहारदार कथाकथन झाले. सायंकाळी डॉ. केशव खटिंग यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कवींचे कविसंमेलन झाले. यात पन्नास कवींनी आपल्या रचना सादर केल्या़
महामानवांची वाटणी परवडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:53 AM
वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे.
ठळक मुद्दे श्रीपाल सबनीस