भोकर : तालुक्यातील थेरबन येथील विवाहितेने प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरुन भावानेच दोघांचाही गळा कापून निर्घृण खून केल्याच्या प्रकरणाचा गुन्हा भोकर जिल्हा सत्र न्यायालयात सिद्ध झाला असून गुरुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत न्या. एम. एस. शेख यांनी शिक्षेचा निकाल राखून ठेवला आहे.तालुक्यात दोन वर्षांपूूर्वी दुहेरी खुनाने खळबळ उडाली होती. थेरबन येथील वेगवेगळ्या जातीतील पूजा दासरे - वर्षेवार (वय २२) व गोविंद कराळे (२५) यांचे प्रेम जुळल्यानंतर समाजात बदनामी होईल, म्हणून घरच्यांनी पूजाचा विवाह भोकर येथील जेठीबा वर्षेवार यांच्यासोबत १० जून २०१७ रोजी केला होता. परंतु गावातीलच गोविंदसोबत प्रेमसंबंध असल्याने पूजाने सासर सोडून प्रियकरास गाठले. याचा अपमान सहन न झालेल्या पूजाचा भाऊ दिगंबर दासरे त्याने आपल्या चुलतभाऊ मोहन दासरे यास सोबत घेऊन बहीण व तिचा प्रियकर यांचा तालुक्यातील दिवशी शिवारात २३ जुलै २०१७ रोजी विळ्याने गळा चिरला होता. दिगंबर दासरे स्वत:हून ठाण्यात हजर झाला.याबाबत भोकर पोलिसांत आरोपी दिगंबर व मोहनविरुद्ध ३०२, ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद होता. तत्कालीन पो.उपनि. सुशील चव्हाण यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात आले.दया दाखवून कमीत कमी शिक्षेची केली विनंतीगुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. ए.एस. शेख यांनी बुधवारी झालेल्या अंतिम तपासणीत सुनावले. आरोपींना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. रमेश राजूरकर यांनी आॅनर किलिंग असल्याने मृत्यूदंडाची विनंती केली तर आरोपीचे वकील मोहन जाधव यांनी आरोपींचे वय, वृद्ध माता- पिता, कुटुंबात कर्ता व्यक्ती असल्याने दया दाखवून कमीत-कमी शिक्षेची विनंती केली आहे. तरी न्यायालय कोणती शिक्षा सुनावते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकालाचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती.
आॅनर किलिंग प्रकरणात आज शिक्षेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:52 AM
भोकर : तालुक्यातील थेरबन येथील विवाहितेने प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरुन भावानेच दोघांचाही गळा कापून निर्घृण खून केल्याच्या ...
ठळक मुद्देदोघांचा केला होता खून भावानेच चिरला होता बहिणीसह तिच्या प्रियकराचा गळा