सोयीचा अहवाल देण्यासाठी लाच मागणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:50 AM2019-01-18T00:50:22+5:302019-01-18T00:51:55+5:30
नांदेड : नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या एका चौकशी प्र्रकरणात सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी ३० हजार ...
नांदेड : नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या एका चौकशी प्र्रकरणात सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ जानेवारी रोजी आलेल्या एका तक्रारीत सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी पोलीस शिपाई वैजनाथ पाटील हे ५० हजार रुपयांची लाच मागत असल्याचे म्हटले होते. तर या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारदाराविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एका प्रकरणात चौकशी सुरु होती. या चौकशीत अहवाल सोयीचा सादर करण्यासाठी वैजनाथ पाटील याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. पाटील याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे १६ जानेवारी रोजी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय लाठकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलीस कर्मचारी शेख चांद, साजेद अली, पोकॉ अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ, शिवहार किडे यांनी रचला. दरम्यान, या प्रकरणात खुद्द तक्रारदारानेच संबधीत पोलीस कर्मचाºयाचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे पत्र एसीबीला दिले आहे. तकरदाराच्या चौकशीचा अहवाल हा २ जानेवरीलाच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात होता. तर तक्रार ३ जानेवारीला देण्यात आली होती.
विशेष म्हणजे एसीबीकडे तक्रार देताना ती तक्रारदाराच्या हस्ताक्षरात असायला पाहिजे. परंतु या प्रकरणात महिलेची केवळ स्वाक्षरी घेण्यात आली, याचाही महिलेने उल्लेख केला आहे.
या प्रकरणात निरपराध कर्मचाऱ्याला गुंतविण्यात आले असून, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गौडबंगाल कळायला मार्ग नाही.
पंचासमक्ष गुन्हा झाला सिद्ध-डोंगरे
सदर प्रकरणात तक्रारदाराने कर्मचाऱ्याचा संबंध नसल्याचे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले आहे. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पोलीस शिपाई वैजनाथ पुंडलिक पाटील याने ३० हजार रुपये लाच मागितल्याची बाब पंचासमक्ष सिद्ध झाली होती. या सर्व सापळ्याचे छायाचित्रीकरणही झाले असल्याचे पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी सांगितले.