नांदेड : मिनी एक्सीस बँक देतो म्हणून देगलूर तालुक्यातील एका २९ वर्षीय युवकाला तब्बल ३ लाख ७६ हजार ५०० रुपयांना गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरुन मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देगलूर तालुक्यातील हनेगाव येथे फोटो स्टुडिओ व्यवसाय असलेल्या नरसागौड नारा गौड केसरे या युवकास आरोपीतांनी वेगवेगळ्या खात्यावर पैसे भरायला लावले. मिनी एक्सीस बँकसाठी सदर युवकाने प्रयत्न सुरू केले. आरोपींनी भारतसीएसपी.कॉम नावाची बनावट वेबसाईट तयार केली. त्यावर प्रधानमंत्री जनधन योजनेचा व डिजीटल इंडिया योजनेचा लोगो वापरला. या प्रकरणात युवकाने विश्वास ठेवून आरोपितांनी सांगितलेल्या खात्यावर रक्कम भरली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नरसागौड केसरे या युवकाने मरखेल पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूकसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक गुंगेवाड करीत आहेत.