मुख्यमंत्र्यांचा फोडाफोडीचा उद्योग लोकशाहीसाठी मारक : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:46 PM2019-03-13T14:46:47+5:302019-03-13T15:02:03+5:30
भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद नीतीचा निषेध
नांदेड : सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी भाजपामध्ये केलेला प्रवेश दुर्दैवी असल्याचे सांगत भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद नीतीचा मी निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोडाफोडीचा हा उद्योग लोकशाहीला मारक असल्याचे चव्हाण म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, युती सरकारचा पाच वर्र्षांचा कारभार सर्वच दृष्टीने अपयशी ठरला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची परिस्थिती महाराष्ट्रात मजबूत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत ही आघाडी शिवसेना-भाजपा युतीपेक्षा अधिक जागा मिळवेल. अझहर मसूद हा अतिरेकी आहे. त्याच्याबद्दल राहुल गांधी यांना वेगळी भावना असण्याचे कोणतेही कारण नाही. काँग्रेस पक्ष मागील अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करतो आहे. काँग्रेस नेते तथा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यूही दहशतवाद्यामुळेच झाला आहे. त्यामुळे एखादा शब्द चुकीचा गेला म्हणून राहुल यांच्या वक्तव्याचा बाऊ करुन राजकारण करणे चुकीचे आहे. नागपूर येथील नाना पटोले यांच्या उमेदवारीवर चव्हाण म्हणाले, पटोले यांची उमेदवारी पक्षाने अद्यापही जाहीर केलेली नाही.
चर्चेचे दरवाजे खुले
वंचित बहुजन आघाडीने २२ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. हे उमेदवार जाहीर केल्यानंतर जागा शिल्लक राहतात किती? लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करायचा असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून वंचित आघाडीसह इतर समविचारी पक्षांसाठी चर्चेचे दरवाजे अद्यापही खुले असल्याचे सांगत आता समोरच्या पक्षाने या दरवाजातून आत यायचे की ते बंद करायचे, याचा निर्णय घ्यावा, असेही अशोक चव्हाण म्हणाले.