भाजपच्या पदाधिकाऱ्यांत सिनेस्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:32 AM2019-06-29T00:32:15+5:302019-06-29T00:34:48+5:30
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही नांदेड भाजपातील अंतर्गत लाथाळ्या उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी खा़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये मोठा कोण? यावरुन चांगलीच जुंपली होती़
नांदेड : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही नांदेडभाजपातील अंतर्गत लाथाळ्या उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे़ यापूर्वी खा़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये मोठा कोण? यावरुन चांगलीच जुंपली होती़ त्यात आता दुस-या फळीतील कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे़ गुरुवारी रात्री मातोश्री मंगल कार्यालय परिसरात जुन्या पदाधिका-याच्या विषयावरुन भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली़
लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले़ परंतु प्रचाराच्या काळात भाजपाच्याच काही निष्ठावंतांनी चिखलीकर यांच्या विरोधात काम केले़ विजयानंतर चिखलीकर यांनी झारीतील अशा शुक्राचार्यांना खड्यासारखे बाजूला करण्यास सुरुवात केली आहे़ त्यावरुन आयात आणि निष्ठावंत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती़ माजी खाख़तगावकर यांनी तर थेट प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता़ त्यावरुन भाजपात उघडपणे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले़
असे असताना आता दुसºया फळीतील पदाधिकारीही एकमेकांवर धावून जात आहेत़ गुरुवारी रात्री मातोश्री मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंग सोढी आणि माजी विरोधी पक्षनेता बाळू खोमणे हे एकत्र आले होते़
सोहळ्यादरम्यान दोघांमध्ये चांगली चर्चाही झाली़ सोहळा आटोपून बाहेर पडत असताना मात्र भाजपाच्याच एका जुन्या पदाधिका-याचा विषय निघाला़ या पदाधिका-याच्या विषयावरुन मात्र दोघांमध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली़
हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांनीही बाह्या वर करीत हाणामारीस सुरुवात केली़ काही मिनिटे दोघांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी सुरु होती़ लग्नसोहळ्यासाठी जमलेल्या काही जणांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला़ त्यानंतर रात्रीच दोघांनी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले़ दरम्यान, सायंकाळपर्यंत या प्रकरणात कुणीही ठाण्यापर्यंत गेले नव्हते़ परंतु दुस-या फळीतील पदाधिकारी आता मुद्यावरुन गुद्यावर आल्याचे दिसून येते़
जुन्या अन् नव्या पदाधिका-यांमध्ये संघर्ष
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपातील जुन्या अन् नव्या पदाधिका-यांतील संघर्ष आणखी तीव्रपणे समोर येत आहे़ जुन्या पदाधिका-यांना डावलले जात असल्याबाबत चर्चाही सुरु आहे़ परंतु आता शिस्तीचा पक्ष असलेल्या भाजपातही पदाधिकारी मुद्यावरुन गुद्यावर येत आहेत़ त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे़