नांदेड शहरात जूनमध्ये मुख्य रस्ते खोदले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:30 AM2019-06-21T01:30:42+5:302019-06-21T01:31:10+5:30
शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे.
नांदेड : शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे. पाऊस लांबल्याचा असाही फायदा शहरात घेतला जात आहे. पाऊस पडल्यानंतर काय? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.
भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम महावितरण करीत आहे. महापालिकेने यासाठी परवानगीही दिली होती. मात्र आता जूनच्या २० तारखेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते खोदण्याचे काम सुरूच होते. पावसाळा लांबला असल्याने या खड्यांचे परिणाम शहरवासियांना दिसत नसले तरीही एखाद्या पावसानेही संपूर्ण शहराची त्रेधा तिरपीट उडणार आहे.
जवळपास ३ ते ४ फूट रुंद आणि ४ फूट खोल असे खोदकाम केले जात आहे. त्याचवेळी वीज वाहिन्या टाकल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे कामही केले जात नाही.
याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता गिरीश कदम यांच्याशी संपर्क साधला असता महापालिकेने ७ जून रोजीच हे काम थांबवण्याचे आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात आजही काम सुरुच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर शहरवासीयांना होणाऱ्या त्रासास जबाबदार कोण? असा प्रश्न पुढे येत आहे.