किनवटचे उपनगराध्यक्ष नेम्मानीवारांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:34 AM2019-05-18T00:34:59+5:302019-05-18T00:36:17+5:30
नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाविरुद्ध १३ नगरसेवकांनी १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता़ त्यावर विशेष सभा घेऊन चर्चा होण्याआधीच उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी शुक्रवारी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला़
किनवट : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाविरुद्ध १३ नगरसेवकांनी १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता़ त्यावर विशेष सभा घेऊन चर्चा होण्याआधीच उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी शुक्रवारी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला़ त्यामुळे अविश्वासाच्या नाट्यमय घडामोडींवर तूर्तास पडदा पडला आहे़ आता नवा उपाध्यक्ष कोण असणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़
भाजपची सत्ता असलेल्या किनवट नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांचा करारानुसार १६ महिन्यांचा कालावधी ३० एप्रिल रोजी संपला होता़ त्यानंतर हे पद नगरसेवक तथा सभापती अजय चाडावार यांना बहाल करण्याचे पक्षाअंतर्गतच्या विचारविनिमयात ठरले होते़ श्रीनिवास नेम्मानीवार यांचा उपनगराध्यक्षपदाचा करारानुसार कालावधी संपल्याने संभाव्य उपसभापती म्हणून ज्याचे नाव समोर आले, त्या अजय चाडावार यांची उत्कंठा शिगेला पोहोचली अन् विद्यमान उपनगराध्यक्ष नेम्मानीवार यांनी राजीनामा द्यावा, याबाबत खलबते सुरू झाली़ दरम्यानच्या काळात काही नगरसेवकांनी श्रीनिवास नेम्मानीवार यांना प्रथम १५ जुलैपर्यंत व नंतर १ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरले; पण उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले चाडावार अस्वस्थ झाले होते़ उपनगराध्यक्ष नेम्मानीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे विशेषत: भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर व अशोक सूर्यवंशी पाटील यांच्याकडे ३० मेपर्यंत मुदतवाढ मागितली होती़ परंतु, पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले़ त्याआधीच म्हणजे १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर झाला अशी खंत श्रीनिवास नेम्मानीवार यांनी व्यक्त केली होती़
भाजपात किनवटमध्ये उघड उघड दोन गट असून एक गट माजी मंत्री डी़बी़पाटील यांचा तर दुसरा गट भाजप नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांचा आहे़ उपाध्यक्ष निवडीच्या वेळी कोणती खेळी तर होणार नाही ना? अशी शंका घेतली जात आहे़ नेम्मानीवार यांच्या राजीनाम्याबाबत नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी मुख्याधिकारी यांना कळविले़ त्यानंतर आता कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे़
पक्षात धुसफूस स्वखुशीने सोडले पद
जिल्हा पातळीवरचे वारंवार फोन येत असल्यामुळे व पक्षात धुसफूस नको म्हणून आपण उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, असे नेम्मानीवार यांनी सांगितले़ पुढेही पक्षासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मी भारतीय जनता पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे़
पक्षाने घेतलेल्या समाजातील सर्व घटकांना सत्तेत सामावून घेण्याच्या भूमिकेच्या समर्थनार्थ व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करत मी पदाचा राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांना श्रीनिवास नेम्मानीवार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे़