ग्रामपंचायत खर्चाची जुळवाजुळव करून सादर करण्याची चिंता निकालापासून तीस दिवसात सादर करावा लागणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:07+5:302021-01-23T04:18:07+5:30
नांदेड : जिल्ह्यातील जवळपास ९०७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल हाती आले असून, आता निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनाही निवडणूक ...
नांदेड : जिल्ह्यातील जवळपास ९०७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल हाती आले असून, आता निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनाही निवडणूक काळात झालेल्या खर्चाचे गणित जुळवून तो दाखल करण्याची चिंता लागली आहे. अनेकांनी खर्च दाखल करण्याचे काम नियमितपणे काम करणाऱ्या व्यक्ती अथवा वकिलांकडे सोपवले आहे. परंतु, विविध बिले, ऑनलाईन खर्च दाखल करणे आदी प्रक्रिया किचकट असल्याने अनेकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे.
मागील निवडणुकीत निवडणूक खर्च दाखल न करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास तीनशे उमेदवारांना नोटीस बजावून निवडणूक लढण्यास अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांचेही धाबे दणाणले असून, खर्च दाखल करण्याची लगबग सुरू झाली आहे. घरपट्टीपासून ते निकाल लागेपर्यंत झालेल्या सर्व खर्चाचे सविस्तर विवरण निवडणूक विभागाकडे सादर करावे लागते. त्यात विविध बाबींच्या पावत्याही जोडाव्या लागतात.