जिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:12 AM2019-07-19T05:12:09+5:302019-07-19T05:12:23+5:30
लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत
- विशाल सोनटक्के
नांदेड : लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जिल्ह्यावर पुनश्च वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत तर भाजप-शिवसेनेनेही युतीची पकड मजबूत करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ४० हजार मतांनी पराभव केला़ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी भोकर, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळाले तर काँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव विधानसभा मतदारसंघासह देगलूर आणि मुखेड मतदारसंघात भाजपाने आपले वर्चस्व दाखवून दिले. त्यामुळेच लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकातही नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊही मतदारसंघात कमालीची चुरस पहायला मिळणार आहे.
महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर अद्यापही काँग्रेसची मजबूत पकड आहे. तर दुसरीकडे लोकसभेतील विजयामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे तर भाजपाकडून डॉ.तुषार राठोड, दिलीप कंदकुर्ते, राजेश पवार आदी कामाला लागले आहेत. देगलूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सुभाष साबणे आणि हदगावमधून नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारीही निश्चित आहे. उर्वरीत मतदारसंघात सर्वच पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे.
हदगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून माधवराव पाटील आणि गंगाधर पाटील चाभरेकर यांनी फिल्डींग लावलेली आहे. देगलूर मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर यांचे नाव पुढे असले तरी येथे ऐनवेळी नवा चेहरा काँग्रेस मैदानात उतरवू शकते. मुखेड मतदारसंघातही सलग दोनवेळा काँग्रेस पराभूत झालेली आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नव्या चेहºयाचा शोध सुरू आहे. भाजपाकडे यंदा इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे नाव पुढे येत आहे़ येथून बालाजीराव शिंदे हेही आग्रही आहेत़ तर किनवटसाठी संध्या राठोड आणि अशोक पाटील सूर्यवंशी प्रयत्नशील आहेत. देगलूर मतदारसंघातून शिवाजीराव वाडेकर यांच्या नावाची चर्चा आहे़
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर हे लोकसभेवर निवडून गेले आहेत़ चिखलीकर यांची या विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे़ त्यामुळे येथून कोणाला लॉटरी लागते़ याबाबत उत्सुकता आहे़ चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे, त्यांचा मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर आणि मुलगी जि़ प़ सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांची नावे चर्चेत आहेत़ युती झाल्यास मात्र भाजपासाठी ही जागा शिवसेनेकडून सोडविण्यासाठी चिखलीकरांना ताकद लावावी लागणार आहे़ नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे येथून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील या इच्छुक आहेत़
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मतदान सुमारे ९ टक्क्यांनी घसरले आहे. तर भाजपाच्या मतात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत लक्षवेधी मते खेचत निवडणुकीचे गणित बदलले. या आघाडीने पाच विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी २५ हजारांहून अधिक अशी १४ टक्के मते मिळविली़ त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीची भूमिका काय राहते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
>सर्वात मोठा विजय
भोकर : अमिता चव्हाण
(काँग्रेस) ४७,५५७ (पराभव : डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजप)
>सर्वात कमी
मताधिक्याने पराभव
नांदेड दक्षिण : दिलीप कंदकुर्ते - (भाजप) ३२०७ (विजयी : हेमंत पाटील- शिवसेना)