नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटाेले यांनी स्वीकारल्यानंतर राज्यात पक्ष संघटनेत व्यापक फेरबदल केले जाणार आहेत. त्यानुसार राज्यातील शहर व ग्रामीण असे २४ जिल्हाध्यक्ष लवकरच बदलले जाणार आहेत. या बदलात आपल्याला संधी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी राजकीय गाॅडफादरमार्फत माेर्चेबांधणीही चालविली आहे.
राज्यात शहर व ग्रामीण असे मिळून एकूण ६० जिल्हाध्यक्ष आहेत. त्यातील २४ चेहरे बदलले जाणार आहेत. त्यामध्ये नाशिक शहर, पुणे शहर तसेच रायगडच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले गेल्याने त्यांच्या जागेवर अन्य कुणाची वर्णी लावली जाईल. अकाेला शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षही बदलले जाणार आहेत. वाशिममध्ये २२ वर्षांपासून दिलीप सरनाईक जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना इतरत्र सामावून घेऊन जिल्हाध्यक्षपदी आमदार अमित झनक या तरूण चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. राज्यातील सर्वच विभागात कमी - अधिक प्रमाणात हे बदल केले जात आहेत. प्रभारी अध्यक्ष असलेल्या ठिकाणी पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. संघ व भाजपाविराेधात प्रखर भूमिका घेणाऱ्यांनाच जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीतही स्थान दिले जाईल. तर आपल्या साम्राज्याला धक्का लागू नये म्हणून संघ - भाजपाबाबत बाेटचेपी भूमिका घेणाऱ्या प्रमुख दिग्गज नेत्यांना राज्य कार्यकारिणीतून घरचा रस्ता दाखविला जाणार आहे.
चाैकट
आठवडाभरात प्रदेश कार्यकारिणी
नाना पटाेले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ६ कार्याध्यक्ष व १४ प्रदेश उपाध्यक्षांची नियुक्ती केली हाेती. उर्वरित कार्यकारिणी आठवडाभरात जाहीर हाेणार आहे. सर्वसमावेशक कार्यकारिणी देताना पक्षाच्या निष्ठावान परंतु अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना सामावून घेताना सामाजिक समताेलही राखला जाणार आहे.
चाैकट......
विभागनिहाय बदलले जाणारे अध्यक्ष
काेकण - ५
पश्चिम महाराष्ट्र - ५
उत्तर महाराष्ट्र - ५
मराठवाडा - ३
पश्चिम विदर्भ - ४
पूर्व विदर्भ - २