उमरी : कोरोना साथीच्या संशयावरून नांदेडला हलविण्यात आलेल्या " त्या " रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव आल्यामुळे तालुक्यातील आरोग्य खात्याने निश्वास सोडला. तालुक्यातील नागरिकांनी येत्या १४ तारखेपर्यंत घराबाहेर पडू नये. आपली काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
कोरोना साथीच्या सदृश्य लक्षणे असलेला एक रुग्ण अब्दुल्लापुरवाडी येथून उमरीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल झालेला होता . कोरोना साथीच्या संदर्भातील सर्व लक्षणे व त्याचा पुण्याहून आलेला इतिहास या गोष्टी पाहता डॉक्टरांनाही याबाबत शंका वाटल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते . या रुग्णाचे स्वॅब नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आज ३१ मार्च रोजी पाच वाजताच्या सुमारास उमरी येथे प्राप्त झाला. सदर रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून काळजी करण्याची गरज नाही . असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. देवराये, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण , वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव विभुते , डॉ. एम. एम. चंदापूरे यांनी सांगितले . अजूनही येत्या १४ तारखेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सुरक्षितपणे आपापल्या घरीच राहावे . असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले.