coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ११५ जणांमध्ये एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:55 PM2020-05-11T19:55:25+5:302020-05-11T19:57:26+5:30
सोमवारी ११३ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
नांदेड :नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे़ कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती़ त्यात सोमवारी नांदेडकरांना थोडा दिलासा मिळाला आहे़ पाठविलेल्या ११५ स्वॅबपैकी ११३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे़ नांदेडात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ झाली आहे़
गुरुद्वारा लंगर साहिब येथे एकाच दिवशी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती़ त्यानंतर दररोज रुग्णांच्या संख्येत वाढच होत गेली़ त्यात आतापर्यंत नांदेड शहरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ रविवारी नव्याने आढळलेल्या सहा रुग्णांमुळे नांदेडने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अर्धशतक गाठले होते़ दिवसेंदिवस रुग्णसंख्येत होणारी वाढ नांदेडकरांची चिंता वाढविणारी आहे़
सोमवारी मात्र नांदेडकरांना थोडा दिलासा मिळाला आहे़ प्राप्त झालेल्या ११५ अहवालापैकी ११३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर दिल्ली येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ हा व्यक्ती दिल्ली येथील रहिवाशी असून त्याला एनआरआय यात्रीनिवास येथे ठेवण्यात आले होते़ आतापर्यंत प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे ९८ हजार ६९० जणांची तपासणी करण्यात आली आहे़ १८२८ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी १७०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ५२ एवढी आहे़ पॉझिटिव्ह रुग्णापैकी ११ रुग्णांवर विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ३३ जणांवर पंजाब भवन येथील कोविड केअर सेंटर तर एका रुग्णावर माहूर येथे उपचार करण्यात येत आहेत़ या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़
किवळा येथील एका चालकाला पंजाबला गेल्याने कोरोनाची लागण झाली होती़ त्याच्या संपर्कातील १९ जणांना क्वारंटाईन केले आहे़ ९ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ ते सर्वजण निगेटिव्ह आले आहेत़ अंबानगर सांगवी येथील एक चालकही कोरोनामुळे बाधीत झाला आहे़ त्याच्या संपर्कातील चौघेजण क्वारंटाईन आहेत़ रहेमतनगर येथे कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत़ त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे़ या चौघांच्या संपर्कातील ११२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़
गुरुद्वरा लंगर साहिब येथे आतापर्यंत ३५ जण कोरोनामुळे बाधीत झाले आहेत़ त्यांच्या संपर्कातील १४१ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एक महिलाही पॉझिटिव्ह आढळली होती़ तिच्या संपर्कातील ३३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले़ त्याचवेळी आघाडा बाळापूर येथील एक चालकही पॉझिटिव्ह आढळला होता़ त्याच्या संपर्कातील ६ जण क्वारंटाईन आहेत़ नवीन कौठा येथील रवीनगर येथे एक चालक कोरोना बाधीत झाल्यामुळे त्याच्या संपर्कातील ५ जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत़ करबलायेथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला़ त्याच्या २७ जण आता क्वारंटाईन केले आहेत़ माहूर तालुक्यातही मालेवाडा येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे़ त्याच्या संपर्कातील १२ जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत़
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्व कोरोन्टाईन
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे़ या सर्व रुग्णांच्या संपर्कातील ५३७ व्यक्तींनाही आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे़ यात सर्वाधिक श्री लंगर साहिब येथील ३५ रुग्णांच्या संपर्काती १४१ जणांचा समावेश आहे़ जिल्ह्यात २२ एप्रिलपासून आजपर्यंत कोरोना रुग्णांची संख्याही ५१ पर्यंत पोहोचली आहे़ शहरातील पीरबुºहाणनगरातील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ त्यांच्या संपर्कातील प्रारंभी ३७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले़ अन्य ५४ जणही ताब्यात घेण्यात आले होते़ या सर्व ९१ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यानंतर शहरात अबचलनगर येथे दुसरा रुग्ण आढळला़ त्याच्या संपर्कातीलही ३२ जणांना विलगीकरण करताना १८ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यात दोघे पॉझिटिव्ह आले आहेत़ ३२ जण क्वारंटाईनमध्येच आहे़ अबचलनगरमधील एका ज्येष्ठाचाही मृत्यू झाला होता़ त्याच्या संपर्कातील ५५ नागरिक क्वारंटाईन करण्यात आले असून, संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले़