नांदेड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खाजगी उद्योगधंदे व कारखाने इत्यादी मधील कामगार इतर इतर ठिकाणीं स्थलांतरित होत असतील तर अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटणकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला़
कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून काही उद्योगधंदे व कारखान्यातील कामगार हे एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होत असल्याचे निदर्शनास येत आहे़ संबंधित कामगारांना सांभाळण्याची जबाबदारी त्या-त्या कारखाने व उद्योग, व्यवस्थापन यांची आहे. या कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी व सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी करण्यात यावी़ याबरोबरच गरज पडल्यास या कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेणे संबंधिताची जबाबदारी राहील असे स्पष्ट करीत डॉ़ विपीन यांनी याप्रकरणी हलगर्जी झाल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कंत्राटदारांनी कामगारांची व्यवस्था करावी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे जेथे काम चालू आहे तेथील संबंधित कंत्राटदार यांनी परराज्यातील व इतर कामगारांची व्यवस्था करावी. याबाबत काही तक्रारी किंवा अडचणी आल्यास तसेच अधिक माहितीसाठी श्री भिंगारे, प्रादेशिक अधिकारी महा औद्योगिक विकास महामंडळ नांदेड मोबाईल क्रमांक ९९७६६९७७११ यांचेकडे व श्री सय्यद मोहसीन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड मो.क्रमांक ७२७६२१६०६६ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी इटणकर यांनी केले आहे़