नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे़ शनिवारी सकाळी ९७ अहवालांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ तर सायंकाळी त्यामध्ये आणखी सहा जणांची भर पडली असून दिवसभरात नऊ रुग्ण आढळून आले आहेत़ यातील पाच रुग्ण कुंभार टेकडीचे, तर मुखेड येथे २ आणि करबलानगर येथेही २ रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णसंख्या आता १२५ झाली आहे़
जिल्हा प्रशासनाने शनिवारपासून सर्व बाजारपेठ खुली करण्याचे आदेश दिले आहेत़ परंतु, त्यासाठी अटी आणि शर्थींचे पालन करण्याची गरज आहे़ तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत़ परंतु, हे रुग्ण कंटेमनेंट झोनमधील आहेत़ शनिवारी ९७ जणांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला होता़ त्यातील ८८ जण निगेटिव्ह निघाले़ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ त्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे़ या रुग्णांना यात्री निवास व एनआरआय भवन येथे ठेवण्यात आले आहे़ हे तिघेही जण कुंभारटेकडी परिसरातील आहेत़
यापूर्वीही कुंभार टेकडीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ तर सायंकाळी सहा वाजता १३५ अहवालांपैकी १२० जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये करबला नगर येथील एक पुरुष अन् एक महिला असे दोन, कुंभार टेकडी येथील एक पुरुष अन् एक महिला तर मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील एक पुरुष आणि एक महिला असे रुग्ण आढळून आले आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात १२५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ५२ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
आतापर्यंत प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १ लाख ३१ हजार ४०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे़ तर ३ हजार ८२ जणांचे नमुने घेण्यात आले होते़ त्यापैकी २ हजार ७४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ ११९ स्वॅब अनिर्णीत झाले़ १४ जणांचे स्वॅब नाकारण्यात आले होते़ आतापर्यंत सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ सध्या रुग्णालयात ६२ जणांवर उपचार सुरु आहेत़ नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कुंभारटेकडीची चिंता वाढलीशहरातील कुंभारटेकडी भागात गेल्या काही दिवसांपासून दररोज रुग्ण आढळून येत आहेत़ शनिवारी एकाच दिवशी या भागातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ अगोदर आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात हे रुग्ण आले होते़ आता या रुग्णांच्या संपर्कात आणखी कोण-कोण आले, याचा शोध घेण्यात येत आहे़ त्याचबरोबर करबलानगर येथेही यापूर्वी रुग्ण आढळले होते़ शनिवारी त्या ठिकाणच्या रुग्णात आणखी दोघांची भर पडली आहे़ तर दुसरीकडे सांगवी भागातील पॉझिटिव्ह रुग्णाचा सोर्स शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे़ कंटेनमेंट झोनची संख्याही आता वाढत चालली आहे़