coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:15 PM2020-05-21T22:15:24+5:302020-05-21T22:17:14+5:30
पॉझिटिव्ह आढळलेल्या एकाचा झाला मृत्यू
नांदेड : नांदेडकरांसाठी गुरुवारचा दिवसही चिंता वाढविणारा ठरला. रात्री नऊच्या सुमारास प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ११६ वर गेली आहे. दुसरीकडे गुरुवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही सहावर गेली आहे.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यातील सहा जण बाधित असल्याचे आढळून आले. धक्कादायक म्हणजे दोन रुग्ण गाडीपुरा भागातील असल्याने या भागात कोरोनाने पहिल्यांदाच शिरकाव केल्याचे दिसून आले. या दोन्ही रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा गुरुवारीच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही आता सहा इतकी झाली आहे. नांदेड शहरातील यात्री निवास परिसरातील एकजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तर दोघेजण मुखेड तालुक्यातील रावणकुळा येथील आहेत. तर एक बाधित रुग्ण हा बिलोली तालुक्यातील केरुर येथील असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले. मुखेड तालुक्यातील दोन्ही रुग्णावर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत तर बिलोली तालुक्यातील केरुर येथील रुग्णावर बिलोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. नव्याने सहा बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, ११६ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर ४१ रुग्ण हे बरे झाल्यामुळे उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार ७१६ व्यक्तींनी जिल्ह्याबाहेरुन प्रवेश केल्याचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षणातून पुढे आले. या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. तर बाधित आढळून आलेल्या ११६ रुग्णांपैकी सहा जणांचा आजवर मृत्यू झाला असून ४१ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
उर्वरीत ६८ रुग्णांपैकी नऊ रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय पंजाबभवन कोवीड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. तर ५२ रुग्णांवर यात्रीनिवास कोवीड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील बाधित आढळून आलेल्या रुग्णावर संबंधित तालुका ठिकाणच्या कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याने प्रशासनाने कळविले आहे.
बिलोली, मुखेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव
च्मागील काही दिवसात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रादूर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. बुधवारी नायगावसह भोकर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुरुवारी बिलोलीसह मुखेड तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही रुग्णावर संबंधित तालुक्याच्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले असून प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
स्नेहनगरमध्ये खबरदारी
बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले होते. यातील एक बाधित स्नेहनगर पोलीस कॉलनी येथील असल्याचे पुढे आल्यानंतर गुरुवारी प्रशासनाने या भागात खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या.