coronavirus : नांदेड जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरळीत होणार-जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 08:05 PM2020-05-11T20:05:07+5:302020-05-11T20:05:32+5:30
तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
नांदेड : कोरोना संकटाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचवेळी आर्थिक घडीही सुरळीत करण्यासाठी आता शहर व जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून टप्याटप्याने कोण-कोणते व्यवहार करता येतील, याबाबत मंगळवारी विस्तृत माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सोमवारी झूम अॅपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले आहेत. यातील ३६ रुग्ण हे श्री लंगर साहिब गुरुद्वारातील आहेत. उर्वरीत रुग्ण शहरातील इतर भाग तसेच माहूर तालुक्यातील एका रुग्णाचाही समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्या ही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. पण त्याचवेळी औरंगाबाद, यवतमाळ, लातूर, परभणी सारख्या जिल्ह्यानेही आपले व्यवहार काही प्रमाणात सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील व्यवहारही सुरू केले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. हे व्यवहार सकाळी ७ ते १ किंवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील हेही स्पष्ट केले जाणार आहे. शहरातील बॅरीकेटींग काढण्यात येत आहे. ही बॅरीकेटींग आता आवश्यक ठिकाणीच ठेवली जाणार आहे. काही ठिकाणची काढली जाईल तर काही ठिकाणी नव्यानेही बॅरीकेटींग करावी लागेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
श्री लंगर साहिब गुरुद्वारा येथील अडकलेले भाविक व तेथील कर्मचारी यांची तपासणी केली जात आहे. या सर्व प्रक्रियेत लंगर साहिब गुरुद्वाराकडून आवश्यक ते सहकार्य केले जात असल्याचेही ते म्हणाले. लंगर साहिब प्रशासनाला नोटीसचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांनीही शहरातील परिस्थितीबाबत माहिती दिली. प्रशासनाच्या तसेच महापालिकेच्या सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना रुग्णांना आता दहा दिवसात सुट्टी
एखाद्या रुग्णाचा रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्याला दहा दिवस उपचार दिले जाणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह येताच त्याला रुग्णालयात १४ दिवस क्वॉरन्टाईन ठेवले जात होते. मात्र शासनाच्या नव्या सुचनानुसार निगेटीव्ह रुग्णांना आता दहा दिवसानंतर घरी सोडले जाईल. मात्र त्यांना होम क्वॉरन्टाईन राहण्याच सल्ला दिला जाणार आहे.