coronavirus : बारडमध्ये मुंबईहून पायी आलेला तरुण पॉझिटिव्ह; नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या ५३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:50 PM2020-05-12T19:50:11+5:302020-05-12T19:51:20+5:30
माहूरपाठोपाठ आता बारडमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण
बारड : आतापर्यंत फक्त नांदेड शहरातच कोरोनाचे रुग्ण आढळत होते़ परंतु, आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ दोन दिवसांपूर्वी माहूर येथे एक रुग्ण आढळला होता़ त्यानंतर मंगळवारी बारड येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे नांदेडातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५३ वर पोहोचली आहे़ तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे़
आतापर्यंत एकूण प्रवासी आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १ लाख ६९८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे़ आतापर्यंत २ हजार २ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यापैकी १७३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर १८८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत़ मंगळवारी प्राप्त झालेल्या २४ अहवालांपैकी १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ पॉझिटिव्ह असलेल्या १२ रुग्णांवर विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत़ तर पंजाब भवन आणि यात्री निवास येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३३ रुग्ण दाखल आहेत़ माहूर आणि बारड येथे प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरु आहेत़
बारड येथील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत असलेल्या कोरोना केअर सेंटर मध्ये १० मे रोजी संशयित म्हणून मुंबईहून आलेले चार प्रवाशांना सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असल्याने क्वारंन्टाईन करण्यात आले होते़ त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक के़एच़ कदम यांनी दिली़ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते़ मुंबईहून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिली़ ग्रामपंचायतकडून रुग्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर भीमनगर, शांतीनगर, इंदिरानगर, शंकरनगर हा भाग सील करण्यात येणार आहे़ औषधी दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव यांनी सांगितले़
इतर जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी
कोरोना केअर सेंटरमध्ये मुंबईहून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात प्रवासी रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे़ त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तर एकूण सहा व एका रुग्णालयातील एक कर्मचारी यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असल्याची माहिती डॉ़किशोर कदम यांनी दिली़ १२ मे रोजी रुग्णालयामध्ये सांगली व इतर ठिकाणावरून ३५ नवीन प्रवासी तपासणीसाठी आले आहेत़ त्यांची रुग्णालय प्रशासनाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून होम क्वारंटाईन केल्याचे डॉ़ उमेश पांचाळ यांनी सांगितले़