नायगाव तालुक्यातील नरसी फाटा येथे मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. याबरोबरच उमरीसह धर्माबाद, कंधार, लोहा, देगलूर आदी तालुक्यातही सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मका तसेच कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नांदेडसह देगलूरमध्येही शुक्रवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. तर बिलोली तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे पिके आडवी पडल्याचे चित्र होते. धर्माबादेत शुक्रवारी पहाटे पाच ते सहा या वेळेत तासभर पाऊस कोसळला. याच वेळेत हणेगावलाही पावसाने झोडपले. पावसामुळे विजेचाही ठिकठिकाणी लपंडाव सुरू होता. हदगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या पावसाने गहू, चना, ज्वारीचे नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया ...........
अवकाळी पावसाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात कहर केला आहे. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला असून हातातोंडाशी आलेल्या हरभरा, ज्वारी, गव्हासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
- गंगाधर निर्मले (शेतकरी), पार्डी, ता.मुदखेड.
प्रतिक्रिया ..........
शुक्रवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने गव्हाचे पीक जोमदार आले होते. मात्र निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
-शिवाजी माकणे, बारूळ, ता.कंधार.
(फोटो कॅप्शन - कंधार तालुक्यातही शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे फुलवळ परिसरात उभा गहू आडवा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (छाया- मधुकर डांगे)
फोटो क्रमांक - १९एनपीएच एफईबी १८.जेपीजी)