भात लागवड करताना डोहात बुडून मजूर तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 04:50 PM2019-07-22T16:50:29+5:302019-07-22T16:54:34+5:30
सुदैवाने तरुणीस वाचविण्यास गेलेली दुसरी तरुणी बचावली
बिलोली (नांदेड ) : मजुरीसाठी तेलंगणात गेलेल्या तालुक्यातील शिंपाळा येथील एका मजूर तरुणीचा शेतातील डोहात बुडाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेखा मारोती गरबडे (१९ ) असे मृत तरुणीचे नाव आहे. २० जुलै रोजी घडलेल्या या घटनेत अन्य एका तरुणीस बुडताना वाचविण्यात यश आले आहे.
सध्या बिलोली तालुक्याच्या सिमेवरील तेलंगनातील बहुतांश गावच्या शेत शिवारात पावसाळी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथे जादा मजुरी मिळत असल्यामुळे तालुक्यातील मजुरांचे जथ्थेचे-जथ्थे तेलंगाणा राज्यात दररोज कामाला जात आहेत. शनिवारी (दि. २०) शिंपाळा येथील काही मजूर महिला बोधन तालुक्यातील झाडी या गावी एका शेतात भात लागवडीसाठी गेल्या होत्या. कामात मग्न असताना रेखा मारोती गरबडे ही मजूर तरुणी अचानक शेजारील डोहात पडली. तिला वाचविण्यासाठी सिमा गंगाराम गड्डम गेली असता तीही त्यात पडली. यानंतर इतर महिला आणि शेतमालकाने मोठ्या शिताफिने दोघींना बाहेर काढले. यावेळी सीमा सुखरूप होती तर रेखा गंभीर होती. तिला तत्काळ बोधनच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रेखाचा मृत्यू झाला.