मारतळा (नांदेड ) : लोहा तालुक्यातील हातणी शिवारात एका वीटभट्टीवरील हौदातून जनावरांसाठी पाणी शेंदताना तोल गेल्याने शेतमजूर हौदात पडला़ त्याला वाचविण्यासाठी शेतकऱ्याने उडी घेतली असता दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २१) रात्री घडली.
गंगाधर पांडुरंग उबाळे (वय ४५) व केशव ग्यानू हाणवते (वय १८ ) असे मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, हातणी येथील उबाळे हे शेतामध्ये दुग्ध व्यवसाय करतात. जनावरांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्याकडे केशव हा मजूर काम करतो. मंगळवारी रात्री केशव जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेताजवळील वीटभट्टीच्या हौदाजवळ घेऊन गेला. पाणी काढत असताना केशव तोल गेल्याने हौदात पडला. त्याने मदतीसाठी आरडओरडा केल्याने उबाळे त्याच्या मदतीसाठी आले. त्यांनी हौदात उडी घेतली. मात्र,हौद खोल असल्याने दोघांचाही त्यात बुडून मृत्यू झाला.
हे ठिकाण निर्जन असल्याने आरडाओरड करूनही त्यांना वेळीच मदत मिळाली नाही. गाव परिसरात भीषण पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ जनावरांना पाणी पाजण्यासाठी वीटभट्टीवरील याच हौदातील पाण्याचा वापर करतात. मृत केशव हा अविवाहित होता तर शेतमालक गंगाधर उबाळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, मुलगी-मुलगा असा परिवार आहे.