होमगार्डच्या भरतीसाठी डी.एड., बी.एड. धारक उतरले मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:06 PM2019-07-16T18:06:31+5:302019-07-16T18:10:26+5:30
बेरोजगार तरूणांचा मोठा लोंढा होमगार्ड भरतीत पाहायला मिळत आहे
नांदेड : गुरूजी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डी.एड., बी.एड. करणारे अनेकजण होमगार्ड भरतीसाठी सोमवारी मैदानात उतरल्याचे चित्र नांदेडात पाहायला मिळाले़ अनेक दिवसांपासून शासनाकडून नोकरभरती करण्यात न आल्याने बेरोजगार तरूणांचा मोठा लोंढा होमगार्ड भरतीत पाहायला मिळाला़
जिल्ह्यातील विविध पथकासाठी नांदेड येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सुरू असलेल्या होमगार्ड भरतीसाठी सोमवारी जवळपास साडेतीन हजार उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे़ यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे पदवीधर आणि पदव्युत्तर असल्याचे दिसून आले़ दहावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या होमगार्ड पदासाठी एम.ए., बी.एड. शिक्षण पूर्ण होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो तरूण रोजगार मिळविण्यासाठी होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात उतरले आहेत़
नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १८३ पुरुष व १७९ महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी १५ जुलै रोजी पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे नावनोंदणी करण्यात आली़ यामध्ये ३ हजार २९८ पुरूष उमेदवार तर ३३५ महिला उमेदवार असल्याची माहिती जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली़
पहिल्या दिवशी उमेदवारांची छाती आणि उंचीची मोजणी करण्यात आली़
उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नाही़ त्यामुळे होमगार्ड भरतीत सहभागी झालोय़ बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सरकारने करावे़ - नितीन गादेकर, एमए, एमजे़