ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा उडाला बोजवारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:59 AM2018-10-15T00:59:17+5:302018-10-15T00:59:39+5:30
ग्रामीण भागात सध्या थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे़ लहान बालक, तरुण, वृद्ध नागरिक आजाराने त्रस्त असताना संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या भागाकडे फिरकूनही पाहत नसल्याने आरोग्य सेवेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र कौठा सर्कलमध्ये दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
कौठा : ग्रामीण भागात सध्या थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे़ लहान बालक, तरुण, वृद्ध नागरिक आजाराने त्रस्त असताना संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या भागाकडे फिरकूनही पाहत नसल्याने आरोग्य सेवेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र कौठा सर्कलमध्ये दिसत आहे़
प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळअंतर्गत कौठ्यात उपकेंद्र असून वाढती लोकसंख्या पाहून शासनाने १९९५-९६ मध्ये येथे एक वैद्यकीय, ४ कर्मचारी नियुक्त केले होते़ मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनाने उपकेंद्र बंद अवस्थेत आहे़ कोण कर्मचारी आहे, नाही याचा पत्ता गावकऱ्यांना नाही़ आरोग्य केंद्रावर कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने कर्मचारी उपस्थित राहत नाहीत़ यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे़
कौठा उपकेंद्रावर दोन महिला कर्मचारी, एक पुरुष एमपीडब्ल्यू त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने जागा रिक्त आहे़ तर दुसरी महिला कर्मचारी लोहगाव येथून अपडाऊन करत आहे़ ते कधी येतात कधी जातात याची नोंद कुठेच नाही़ गृहभेटी तपासणी करण्यात येत नाही़ सुपरवायझर तर पोलिओ किंवा लसीकरणालाच हजर असतात़ एरव्ही मात्र कोणीच इकडे फिरकत नाहीत़ गावापासून उपकेंद्र १ किमी लांब असल्याने तेथील अवस्था पाहण्यासारखी इमारत शोभेची वास्तु बनले आहे़ परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़
- सध्या खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल दिसत आहेत़ कौठा, शिरुर, चौकीमहाकाया, कौठावाडी येथील २० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असताना लोकप्रतिनिधी गप्प असल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे़ याचे जिल्हा आरोग्य विभाग लोकप्रतिनिधींना काहीच देणेघेणे नाही का, असा प्रश्न उभा राहत आहे़ शासन एकीकडे गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध योजना राबवित असताना स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांच्या वक्रदृष्टीने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र शोभेची वास्तू बनले आहेत.