मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:06 AM2019-05-20T00:06:48+5:302019-05-20T00:08:21+5:30
दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
श्रीक्षेत्र माहूर : दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेत राज्य सरकारने उन्हाळी सुट्यातही या टंचाईग्रस्त गावांतील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत.
२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यातही मध्यान्ह भोजन देणे अपेक्षित होते. मात्र माहूर तालुक्यातील काही बोटावर मोजण्याएवढ्या शाळा वगळता इतर अनेक गावांत मध्यान भोजन योजनेबाबतच्या शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचे बोलल्या जात आहे. माहूर पं.स.च्या शिक्षण विभागामार्फत मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आवश्यक असताना अनेक शिक्षक उन्हाळी सुटीनिमित्त गावाकडे गेले आहेत़ अशावेळी अनेक ठिकाणी खिचडी कामगारावरच सर्व जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे दिसत आहे.
जि. प. शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गटशिक्षणाधिकारी यांना खडे बोल सुनावल्यानंतर मध्यान्ह भोजन नियोजन या शीर्षकाखाली अनेक शिक्षकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या़
प्रत्यक्ष मात्र एकही शिक्षक शाळेवरच नव्हे, तर मुख्यालयीसुद्धा दिसून आले नसल्याने शिक्षण विभागाचे नियोजन म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे संतप्त नागरिकांतून बोलल्या जात आहे. माहूर पं. स. चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांनी मध्यान्ह भोजनाची पाहणीसुद्धा केली नसल्याची माहिती आहे. शिक्षण विभागाने गोपनीय पथक पाठवून प्रत्यक्ष शाळाना भेटी दिल्यास गौडबंगाल समोर येणार आहे.
टंचाईग्रस्त यादीत ९२ गावांचा समावेश
पेसायुक्त तालुक्यातील अनेक गावांचे शालेय विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित असून अनेक गावांत खिचडी कामगारच कामे करत आहेत़ शिक्षकांच्या ड्युट्या असतानाही प्रत्यक्ष एकही शिक्षक हजर नाही़ मध्यान्ह भोजन ड्युटी पत्रक केवळ नामधारी ठरले आहे़
२४ एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड यांनी टंचाईग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध करून गटशिक्षणाधिकारी माहूर यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते़ त्यामध्ये माहूर तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे.