नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:42 AM2019-03-11T00:42:19+5:302019-03-11T00:42:44+5:30

राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास, चेष्टेला सामोरे जावे लागत आहे. दिलेले गणवेश हे योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळे कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे.

Discontent among women carriers regarding new uniforms | नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये असंतोष

नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये असंतोष

Next

नांदेड : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास, चेष्टेला सामोरे जावे लागत आहे. दिलेले गणवेश हे योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळे कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे.
सदरच्या विदूषकटाईप गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा गणवेश ठरविताना काही मोजक्याच प्रतिनिधींना बोलावून संमती घेण्यात आली होती .परंतु प्रत्यक्षात हा गणवेश धारण केल्यानंतर अनेक असुविधा निर्माण होत असल्याची भावना महिला वाहक व्यक्त करीत आहेत. पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश होता.
या खाकी गणवेशामुळे महिला वाहकांना आदर, सन्मान मिळत होता. खाकी गणवेश धारण करून कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना सुरक्षित व संरक्षित वाटत होते. जनसामान्यांत खाकी गणवेश याबद्दल निर्माण असलेला आदर या महिला भगिनींना प्राप्त होत होता. परंतु आता नवीन देण्यात आलेल्या गणवेशाची प्रतवारी त्याचा रंग व ग्रामीण भागात असा पेहराव हा आत्मसन्मानाला बाधा निर्माण करणारा झाला आहे.
या नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नांदेड विभागातील महिला वाहकांनी नवीन गणवेशाऐवजी पूर्वीचा खाकीचाच गणवेश घ्यावा, असे विनंती अर्ज माननीय उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,राज्य परिवहन महामंडळ यांना केले आहेत.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने परिवहनमंत्री तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ दिवाकर रावते यांना महिला वाहकांना खाकी गणवेश पूर्ववत देण्यात यावा, बसस्थानकात, आगारात सॅनेटरी व्हेंडिग मशीन बसविण्यात याव्यात व महिला कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महिला कामगारांनी स्वाक्षरीनिशी दिलेले आहे .
प्रत्येक विभागात जागतिक महिला दिन साजरा करताना महिला गणवेशाच्या बाबतीत महिला कामगार यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे व हा गणवेश न देता खाकी गणवेश पूर्ववत देण्यात यावा, अशी जोरदार मागणी सर्व महिला कामगारांनी केली आहे.

Web Title: Discontent among women carriers regarding new uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.