‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:18 AM2018-12-18T00:18:40+5:302018-12-18T00:20:36+5:30

फेटाई चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यातही झाला आहे. सोमवारी तर पारा १४ अंशावर आला आहे. त्याचवेळी हवामानातील आर्द्रता ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे़ त्यामुळे मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा गारठला आहे.

District Guardian due to the 'fatty' cyclone storm | ‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला

‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला

googlenewsNext
ठळक मुद्देथंडीची लाट : सोमवारी सूर्यदर्शन झाले नाहीथंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटल्याकाही भागांत रिमझिम पाऊस

नांदेड : फेटाई चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यातही झाला आहे. सोमवारी तर पारा १४ अंशावर आला आहे. त्याचवेळी हवामानातील आर्द्रता ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे़ त्यामुळे मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा गारठला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नांदेड केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार मागील चार दिवसांपासून हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण वाढतच गेले आहे़ तसेच तापमानातही घट झाल्याचे दिसून येत आहे़ १४ डिसेंबर रोजी आर्द्रता ६६ टक्के होती तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस तर कमाल ३० अंश सेल्सिअस होते़ १५ डिसेंबर रोजी आर्द्रता ६५ टक्के, तापमान किमान- १६ तर कमाल २९ अंश सेल्सिअस, १६ डिसेंबर रोजी आर्द्रता ६४ टक्के होती तर तापमानात घट होवून १३़५ अंशावर पोहोचले होते़ कमाल २९ अंशावर गेले होते़ १७ डिसेंबर रोजी आर्द्रता सर्वाधिक ७२ टक्क्यांवर पोहोचली तर तापमान १४़५ अंश, कमाल २७ अंश सेल्सिअस नोंद झाली़
तामिळनाडूच्या समुद्र किनारपट्टीपासून २०० किलोमीटर अंतरापर्यंत फेटाई चक्रीवादळाचा परिणाम दिसेल तसेच येत्या २४ तासांमध्ये पावसाच्या सौम्य सरी बरसतील, असेही त्यांनी सांगितले़ दरम्यान, हवामानात निर्माण झालेल्या गारठ्यामुळे लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच हुडहुडी भरत आहे़ सोमवारी दिवसभर नांदेड शहर व परिसरामध्ये सूर्यदर्शन झाले नाही़ परिणामी नागरिकांना हुडहुडीचा सामना करण्यासाठी ऊबदार कपड्यांसह शेकोट्यांचा आधार घ्यावा लागला़ त्यातच दुपारच्या वेळी काही सेकंद पावसाची भुरभुर झाली़
हवामानात बदल झाल्याने सर्दी-खोकल्याचे रूग्ण वाढले असून दमा आजार असणाऱ्या रूग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ जोपर्यंत चक्रीवादळाचा जोर थांबणार नाही तोपर्यंत वातावरणातील बदल असाच राहील, असेही पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले़
सोमवारी पहाटेपासून मुक्रमाबाद परिसरात थंडी जाणवत होती. थंडीचा गारवा आज दिवसभर होता़ त्यामुळे सूर्याचे दर्शनही झाले नाही़ पुणे येथील वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट असून महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडणार असल्याचे वृत्त दूरचत्रवाहिनीवर प्रसारित झाले आहे़ मुक्रमाबाद परिसरात कोरडा दुष्काळ असला तरी ही लाट मात्र आली आहे़ अबाल वृद्ध महिला-पुरुष मात्र थंडीपासून बचावासाठी टोपी, स्वेटर, घोंगडी, रग, चादर पांघरुण शेकोटी पेटवून बसत आहेत़ तर वृद्ध मात्र चहाचा आधार घेत आहेत़ या थंडीचा परिणाम म्हणजे, आज दिवसभर मुक्रमाबाद परिसरात ढगाळ वातावरण होते़
कुंडलवाडीत कडाक्याची थंडी
कुंडलवाडी : तसा प्रत्येक ऋतू निसर्गत: चार महिन्यांचा असतानाही गत आठ-दहा वर्षांत पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूत कमालीचा बदल झाला आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे़ कुंडलवाडी व परिसरातील नागरिकांनी आता कुठे स्वेटर, मफलर बाहेर काढले असून अजूनही पूर्वीसारखी कडाक्याची थंडी वाजत नसल्याचे जुन्या लोकांतून ऐकावयास मिळत आहे़
थंडीचा कडाका काही रबी पिकांना पोषक असतो़ ज्यामध्ये गहू, हरभरा ही पिके मुबलक उत्पन्न देवून जातात़ परंतु, पूर्वीसारखी थंडी गायब झाल्याने सदर पिकांवर परिणाम दिसून येतो़ कडाक्याची थंडी नसल्याने गरम कपड्यांची विक्री होत नसल्याचे विक्रेते व्यंकटेश सब्बनवार, राम मद्रेवार, शक्करकोट, मुकरम शेख, साईनाथ यमेकर, धुप्पे यांनी सांगितले़
वातावरणातील आर्द्रतेत वाढ
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर फेटाई चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांवर दिसून येत आहे़ नांदेड जिल्ह्यातील तापमान मागील चार दिवसांपासून घटले आहे़ हा परिणाम फेटाई चक्रीवादळाचा असून वातावरणातील आर्द्रतेत वाढ होत असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या नांदेड केंद्राचे निरीक्षक बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़ मागील चार दिवसांच्या तुलनेत सोमवारी सर्वाधिक ७२ टक्क्यांवर आर्द्रता पोहोचली होती, असेही कच्छवे यांनी सांगितले़
मांडवी भागात रिमझिम पाऊस
मांडवी : सप्ताहातील पहिला दिवस म्हणजे सोमवारी सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मांडवी भागात रिमझिम पाऊस चालू झाला. बोचºया थंडीत नागरिक ठिकठिकाणी शेकोटीचा आधार शोधत आहे.
गत दोन दिवसांपासून या भागातील वातावरण ढगाळ असून बोचरी थंडी जाणवत आहे. अशात सोमवारी सकाळपासून वातावरणात गारवा वाढला होता़ पावसाची सुरु असलेली रिमझिम काढणीस आलेल्या तूर पिकास तसेच शेतातील वेचणीस आलेल्या कापूस पिकास धोकादायक बनली आहे. तसेच रबी पिकास काहीसा लाभदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कौठा : ऐन हिवाळ्यात थंडीऐवजी आभाळाने हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे़ घाटेअळीचे आक्रमण झाले आहे.हवामानात अचानक बदल झाल्याने ३ हजार हेक्टर जमिनीवरील हरभरा पीक धोक्यात आले आहे़ तर हाताला आलेली तूर पाऊस पडला तर वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़
दरम्यान, नांदेड शहरातही सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. बदललेल्या या वातावरणामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे.

Web Title: District Guardian due to the 'fatty' cyclone storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.