नांदेड जिल्ह्यात तीन तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:02 AM2018-10-15T01:02:30+5:302018-10-15T01:02:33+5:30
खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित केला जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ४० टक्के तर मुखेड तालुक्यात ५८ टक्के पाऊस झाला आहे. उमरी तालुक्यातही ८२ टक्के पाऊस झाला असला तरी तो वेळेवर न झाल्याने पिके हातची गेली आहेत. देगलूर तालुक्यात भीषण परिस्थिती असून मुखेडमध्येही पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागली.
उपग्रह पाहणीच्या अहवालानुसार राज्यातील १७२ तालुक्यांतील टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी हे तीन तालुके समाविष्ट आहेत. या तीन तालुक्यांमध्ये पुढील आठ दिवसांत पुन्हा एकदा पाहणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांसह इतर तालुक्यांतही पाणी परिस्थिती बिकटच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नुकतीच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी घेतली. या बैठकीत त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मुखेड, देगलूर आणि यासह अन्य भागातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील या तीन तालुक्यांसह अन्य भागातील दुष्काळ निवारणाच्या कामांना प्रशासन लवकरच सुरूवात करणार आहे. त्याचवेळी शासन स्तरावरुन दुष्काळ कधी जाहीर होतो याकडेही लक्ष लागले आहे.
परतीच्या पावसाने दिला दगा
सप्टेंबरमध्ये पाऊस थांबला. त्यानंतर तो येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होतो. यावर्षीही होईल, असे वाटले होते. मात्र यंदा परतीच्या पावसाने दगाच दिला आहे. पिकांना तर फटका बसलाच आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेक तालुक्यात आॅक्टोबरमध्येच पुढे आला आहे. मुखेड तालुक्यात पाणी प्रश्न भीषण आहे. देगलूर तालुक्यातील पिकांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही देगलूर दौरा केला. यावेळी त्यांनी तात्काळ दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे.