ढोलकीच्या तालावर थिरकली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:44 AM2018-09-26T00:44:20+5:302018-09-26T00:44:45+5:30
एकापेक्षा एक सरस लावण्यांनी उपस्थितांना ढोलकीच्या तारावर थिरकविले. युवा कलाकारांच्या अदाकारीने अवघे प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: युवक महोत्सवाचा मंगळवारचा दिवस लावणी नृत्यस्पर्धेने गाजला. एकापेक्षा एक सरस लावण्यांनी उपस्थितांना ढोलकीच्या तारावर थिरकविले. युवा कलाकारांच्या अदाकारीने अवघे प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले होते.
युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातच लावणी स्पर्धेने झाली. या स्पर्धेसाठी अटलबिहारी वाजपेयी कलामंच सजला होता. विद्यार्थ्यांसह रसिक प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. साधारणत: लावणी हा कलाप्रकार सायंकाळच्या वेळी सादर केला जातो. परंतु, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नवीन पायंडा पाडत लावणी सकाळच्या सत्रात घेण्यास मागील वर्षांपासून सुरुवात केली. या बदलास प्रेक्षक, कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनमुराद आनंद लुटला. या लावणी स्पर्धेने कॅम्पसच्या परिसरात तरुणाई ढोलकीच्या ठेक्यावर थिरकताना दिसली.
‘राया मला सोडून जाऊ नका’ ही लावणी नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गणेश काकडे याने सादर केली. तर आकांक्षा मोतेवार या विद्यार्थिनीने ‘ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते’ ही लावणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सादर झालेली ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी धामी काडियेला, हात नका लावू माझ्या साडीला’, ही लावणीही भाव खाऊन गेली. ही लावणी सुरु झाल्यानंतर अनेकांनी रंगमंचापुढे येत तालावर ठेका धरला. ‘दिलबरा नटले तुमच्यासाठी’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘या रावजी बसा भावजी कशी मी राखू तुमची...’ अशा एकापेक्षा एक लावण्यांनी स्पर्धेची उंची वाढली. ‘कुणीतरी यावे कवेत घावे धडधडतंय थरथरत लाही लाही होतंय माज्या अंगाची’ ही लावणी परभणीच्या संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने सादर केली. तर सोनखेडच्या लोकमान्य महाविद्यालयाचा विद्यार्थी कलावंतांनी ‘राया मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा इश्काचा गुलकंद’ या लावण्यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अनेक कलावंतांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकविला. लावणी महाराष्ट्राची जान आहे, लावणी ही महाराष्ट्राची आग आहे तसेच लावणी ही महाराष्ट्राचा साज आहे, हीच परंपरा जपत कलावंतांनी अदाकारी सादर केली आणि त्याला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयातील श्रद्धा जोशी यांनी ‘चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल, दोन उभा रेशमी, गरम लोकरी शाल’ ‘अहो रंग महाली ऊब असून का काटा फुलतोय नवा बाई, बाई गं बाई झोंबतो गारवा’ तर जयक्रांती कला महाविद्यालय लातूरच्या इत्तरगे रुपालीने ‘जगात हो भारी होती एक सवारी हे लावणी नृत्य सादर केले.