- डॉ. गंगाधर तोगरे (कंधार, जि.नांदेड)
नावंद्याचीवाडी (ता. कंधार) येथील दत्ता माधवराव केंद्रे या शेतकऱ्याने आपल्या बोरी बु.मधील ३ एकर शेतीत रेशीम उद्योग उभारला आहे. वार्षिक सुमारे ४५ हजार खर्चाच्या शेतीतून ४ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न काढत त्यांनी आर्थिक कोष उभारण्याची किमया साधली आहे.
तालुक्यातील भौगोलिक क्षेत्रफळ पाहता शेती व्यवसाय करणे मोठे जिकिरीचे आहे. बालाघाट डोंगर, निसर्ग पावसावरील शेतीचे भवितव्य, पावसाचा लपंडाव, अल्प सिंचन आदीमुळे शेती संकटात असते; परंतु शेतीत नवीन प्रयोग करीत आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी मोजकेच असतात. त्यात दत्ता केंद्रे यांनी अथक परिश्रमाने, मानार प्रकल्पाच्या पाण्याचा योग्य वापर करीत तुती लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. बोरी बु. शिवारात तीन एकर शेतीची नांगरटी, पाळी, सरी तयार केली.
गत सात ते आठ वर्षांपासून हा प्रयोग करीत असल्याने बेणे घरचेच उपयोगात आणले. १५ हजार कांडीचे संगोपन केले. ३ बाय ५ बाय दीड अशा पद्धतीने लागवड केली. एका महिन्यात तीन एकरची झाडे तोडली जातात. विविध टप्प्यात अंडेपुंज तयार होतात. आजघडीला ५०० च्या आसपास रेशीम किड्यांची संख्या आहे. हे किडे रेशीम तयार करतात. एका वर्षात बारा ते तेरा क्विंटल रेशीम तयार होत असल्याचे दत्ता केंद्रे यांनी सांगितले. याचा भाव प्रति किलो ३०० ते ३५० रुपये असा आहे़ शेतात २५ बाय ८० आकाराच्या कीटक संगोपनगृह उभारून तेथे रेशीम किडे जतन केले जातात आणि रेशीम तयार करण्यासाठी ते उपयुक्त असल्याने त्यांची आवश्यक ती काळजी घेतली जाते.
तालुका कृषी कार्यालय व मंडळ कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळते. तुळशीराम नागरगोजे हाडोळी (जहा.) यांचे सततचे सहकार्य मिळते. त्यातून मिळणारी ऊर्जा क्रियाशील बनवते. केलेले परिश्रम, कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ यामुळे शेतीत काम करण्याचा नवा उत्साह मिळतो आणि थकवा लुप्त होतो. नांदेड, जालना, अंबाजोगाई या ठिकाणासह कर्नाटक राज्यात बाजारपेठ आहे. खर्च जाता चार लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. मागील वर्षी प्रति क्विंटल ६० हजारांचा भाव मिळाला होता. भावात चढ-उतार होत असतो; परंतु रेशीम उद्योग हा किफायतशीर बनत आहे हे एकंदरीत बाबीवरून दिसते.
बोरी बु़ गाव महादेव मंदिरामुळे चर्चेत आले आहे. गावासह परिसर भक्तिमय झाला आहे. शक्ती, उक्ती व भक्ती याचा सुरेख संगम साधत शेतकऱ्यांनी आपली शेती फुलविली आहे. त्यात केंद्रे यांनी रेशीम शेतीचा प्रयोग केला आहे. तुतीची काळजी, रेशीम किडे यांचे संगोपन करीत, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घेत आर्थिक कोष निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. पूर्वी बाजारपेठ ही बाब अवघड होती; परंतु आता विक्रीसाठी तितकी पायपीट करावी लागत नाही़.