आठवडी बाजार बंद
मरखेल - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर यांनी जारी केला. १२ ते २१ मार्चपर्यंत अंशत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. या कालावधीत औषधी दुकाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
मोफत आरोग्य तपासणी
मुखेड - येथील स्कॉलर कीडस् इंग्लीश स्कूलमध्ये १२ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर होईल. यासाठी रुपेश शिंदे, मोनिका चौधरी, घनश्याम घनदाट, संजीवनी गुडेवार हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कमानीचे दर्शन घेवून भाविक परतले
हिमायतनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील परमेश्वराचे मंदिर बंद ठेवण्यात आले. मंदिराजवळ येवून मुख्य कमानीपासून दर्शन घेवून भाविक आल्यापावली परतले. तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी पूजा केली. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून भाविक येत असतात. मात्र यंदा कोरोनाचा अडसर झाला. यात्राही झाली नाही. यामुळे मिठाई फराळाचे साहित्य, फळ, फुले विक्रेत्यांवर संकट आले.
अखेर कोविड सेंटरला मान्यता
किनवट - येथील तहसील कार्यालयातील कोविड सेंटरला मान्यता मिळाली नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेवून त्याच दिवशी जिल्हा शल्य चिकित्सकांनी मान्यता दिली.
कोरोना दुसऱ्या टप्प्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असतानाही किनवट येथील तहसील कार्यालयातील कोविड सेंटरला मान्यता नव्हती. यासंदर्भातील वृत्त १० मार्च रोजी लोकमतने प्रसिद्ध केले. शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी त्याच दिवशी सेंटरला मान्यता दिली.
निधन वार्ता
भगवानअप्पा वलमशेटवार
बामणीफाटा - कवाना येथील भगवानअप्पा वलमशेटवार कवानकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन नाती असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलाने सहस्त्रकुंड धबधब्यात कुटुंबासह उडी मारून आत्महत्या केली होती.
पूर्णवेळ डॉक्टर हवेत
कासराळी - लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर सुरू आहे. दुसरे वैद्यकीय अधिकारी अडीच महिन्यापूर्वी सेवानिवृृत्त झाले होते. आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २० गावे आहेत. पूर्वी दोन वैद्यकीय अधिकारी होते. यातील एकाची बदली झाली. ती आजपर्यंत रिक्त आहे. सध्या एस.बी. वाडीकर कार्यरत होते. तेही सेवानिवृत्त झाले. त्यांचे पद अद्यापही न भरण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. एक महिन्यापूर्वी येथे एक कंत्राटी महिला वैद्यकीय अधिकारी देण्यात आल्या. मात्र त्यांचे पद कायमस्वरुपी नसल्याने मुख्यालयीही वास्तव्यास नसतात. त्यामुळे रुग्णांचीही गैरसोय होत आहे.
मुतारी उभारण्याची गरज
निवघा बाजार - येथील बसस्थानक परिसरात लघूशंकागृह नसल्याने महिला, प्रवाशांची कुचंबना होत आहे. परिसरातील २२ खेड्यातील नागरिक या ना त्या कारणावरून निवघ्याला येत असतात. महाविद्यालय असल्याने विद्यार्थीही येतात. तसेच महत्त्वाच्या गावांना जाण्यासाठी बसेसही आहेत. मात्र बसस्थानक परिसरात लघूशंकागृह नसल्याने गैरसोय होत आहे.
दिव्यांगांना पाच टक्के निधी द्या
हदगाव - दिव्यांग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत राखीव असलेला ५ टक्के दिव्यांग निधी दिला जावा, अशी मागणी विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. दिव्यांगांवर दरवर्षी निधी खर्च करावा असे शासनाचे आदेश असताना नांदेड जिल्हांतर्गत तालुक्यातील दिव्यांगांवर पूर्ण खर्च झाला नाही. हा खर्च मार्चअखेरपर्यंत करण्यात यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण, शेख फारुख कुरेशी, बंडू पाटे, माराेती लांडगे, बाबा अली आदी उपस्थित होते.