निवडणूक आयोगाचा प्रत्येक हालचालींवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:32 PM2019-03-23T22:32:25+5:302019-03-23T22:45:22+5:30
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर आहे. यासोबतच निवडणूक आयोग उमेदवारासह प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे. यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय वेगवेगळ्या चमू गठीत करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर आहे. यासोबतच निवडणूक आयोग उमेदवारासह प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे. यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय वेगवेगळ्या चमू गठीत करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये व्हिडीओ व्हिजिलन्स टीम (व्हीएसटी) गठित करण्यात आली आहे. ही टीम प्रत्येक उमेदवाराच्या सभा व प्रचाराचे चित्रीकरण करेल. उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची माहिती योग्य आहे की नाही, याची उलट तपासणी एसओआरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दोघांच्या खर्चाच्या आकड्यात तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण ८२ संवेदनशील मतदान केंदे्र्र आहेत. यामध्ये ५२ केंद्र्र नागपूर शहर व ३० रामटेक लोकसभा मतदारसंघात आहेत. या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. संवेदनशील परिसरात मतदान शांततेत पार पडावे यासाठी सीआयएसएफ व सीआरपीएफच्या तुकड्यांची साथ मिळणार आहे. सीआयएसएफचे पथकही जिल्ह्याला याकामी प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने याकामी आवश्यक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
याशिवाय प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या चमू गठीत करण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून आयोग प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून आहे.
१,५४० व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था करायम राखण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ५४० असामाजिक तत्त्वांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून जिल्हा प्रशासन विभागाला देण्यात आली आहे. नागपूर शहरात ५०५ तर ग्रामीण भागात १०३५ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्रचारसभा-रॅलीसाठी ५२ अर्ज
प्रचार सभा, रॅली, जनसंपर्क कार्यालयाच्या मंजुरीसाठी निवडणूक विभागाकडे ५२ अर्ज प्राप्त झाले. यात सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे. यातील ४५ अर्जांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित अर्ज प्रलंबित असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
साडेतीनशे शस्त्र जमा
परवाना असलेले शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ३५० शस्त्रे जमा झाली आहेत. नागपूर शहरात २७५ तर ग्रामीण भागातील ७५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.
अचानक वाहन तपासणी
निवडणुकीच्या काळात दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत यासाठी नागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करताना व्हीडिओ शुटींगही केले जात आहे.