नांदेड : नांदेडरेल्वे विभागात किसान रेल्वे सुरू होऊन ५ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नांदेड विभागातून देशातील विविध भागांत ४०५ किसान रेल्वे धावल्या. या माध्यमातून १ लाख २६ हजार ९२६ टन कृषी माल देशाच्या विविध भागांत पोहोचविण्यात आला. ज्यात कांदा, टरबूज, टोमॅटो आणि द्राक्षांचा समावेश आहे. यातून नांदेड रेल्वे विभागास ५८.५७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
५ जानेवारी २०२१ रोजी नांदेड विभागातून पहिली रेल्वे धावली होती. वर्षपूर्तीनिमित्त विभागीय रेल्वे कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग आणि टीमने केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. नागपूषणराव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक ए. श्रीधर, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक उदयनाथ कोटला, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता प्रशांतकुमार, वरिष्ठ विभागीय रेल्वे कार्मिक व्यवस्थापक जयशंकर चौहाण, विभागीय अभियंता रितेशकुमार आदी उपस्थित होते.
किसान रेल्वेला मालवाहतूक भाड्यात ५० टक्के सूट मिळत असल्याबद्दल शेतकरी मित्रांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपिदरसिंग यांनी यावेळी केले. या रेल्वेची वैशिष्टये म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारणत: ५० किलोमीटर प्रती तास वेगाने धावतात. त्यामुळे शेतीमाल वेळेवर पोहोचतो. शेतकरी यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स टाॅप टू टोटल’ याअंतर्गत किसान रेल्वे गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ५०टक्के दर सवलत देण्यात आली आहे.