बहादरपुरा (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे जांभुळवाडी येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना १८ जुलै रोजी सकाळी ४ ते ६ च्या दरम्यान घडली़
जांभुळवाडी येथील शेतकरी बळीराम भीमराव मुसळे (वय ५५) यांच्या नावे १ हेक्टर ५३ आर जमीन आहे व त्या जमिनीवर बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मयत शेतकरी बळीराम मुसळे यांच्या मुलाने दिली. ते स्वत: शेती कसत होते़ परंतु सतत निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी व बँकेच्या कर्जाचा डोंगर याला कंटाळून स्वत:च्या शेतात १८ जुलै रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले.
सकाळी मुले शेती कामासाठी गेले असता वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन केले असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. उपचारासाठी कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात हालवण्यात आले़ परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सदरील घटनेची फिर्याद मयताचा मुलगा रामचंद्र बळीराम मुसळे यांनी दिल्यावरून कंधार पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी जांभुळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. तपास कंधार पोलिस स्टेशनचे पो. ना. पी.व्ही. टाकरस, हेड कॉ. आर.यु. गणाचार्य, पो.कॉ. एन.टी.विषारी वानरे हे करत आहेत.