नांदेड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक पिकाच्या नुकसानीच्या ठोकताळ्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांचा दसरा, नवरात्र अश्रूत गेली आहे. किमान आता दिवाळी तरी गोड व्हावी. केंद्राकडून मदत मिळेलच परंतु राज्याने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील धनगरवाडी, पार्डी आणि कारेगाव या ठिकाणी त्यांनी नुकसानीची पाहणी केली.यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतकरी उपाशी राहिला नाही पाहिजे. सध्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाने भेद केला नाही. त्यामुळे सरकारनेही भेद करु नये. अस्मानी संकट आलेले असताना सुलतानी संकटापासून वाचविण्याची जबाबदारी सरकारची आहे.त्यासाठी अत्यंत उदार अंतकरणाने मदत दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सत्तेत असणाऱ्यांना पक्ष नसावासत्तेवर असलेल्या कोणत्याही मंत्र्यांना पक्ष नसतो. प्रत्येक जण हा जनतेच्या हिताचे निर्णय घेणाराच असावा लागतो, अशी मला अपेक्षा आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करु, परंतु राज्यानेही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यमंत्री मला बहीण मानत असले तरी, आमचे भावा-बहिणीचे नाते वेगळे आहे. त्यामुळे भाऊ म्हणून नव्हे, तर मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना मदतीसाठी बोलेल असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.