सिंदगी जंगलात मादी अस्वल मृतावस्थेत आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:08 AM2019-02-13T01:08:20+5:302019-02-13T01:09:11+5:30
तालुक्यातील सिंदगी (मो) जंगलातील बीट क्रमांक ७५ ‘ए’ मध्ये आठ वर्षीय मादी जातीचे अस्वल मृतावस्थेत तर तीन महिन्यांचे नर जातीचे जिवंत पिल्लू आढळून आले.
किनवट : तालुक्यातील सिंदगी (मो) जंगलातील बीट क्रमांक ७५ ‘ए’ मध्ये आठ वर्षीय मादी जातीचे अस्वल मृतावस्थेत तर तीन महिन्यांचे नर जातीचे जिवंत पिल्लू आढळून आले.
अस्वलावर शवविच्छेदनानंतर दहनप्रक्रिया पार पडली. अस्वलाच्या तोंडाला मार लागला, असा प्राथमिक अंदाज पशुधन अधिकारी डॉ. एस. जी. सोनारीकर यांनी व्यक्त केला. किनवट वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सिंदगी (मो) कंपार्टमेंट (बिटात) ११ फेब्रुवारी रोजी गस्तीवर असणाºया वनरक्षकास मादी जातीच्या पिल्लाला जन्म देणारे अस्वल मृतावस्थेत दिसले व शेजारी दोन ते तीन महिन्यांचे अस्वलाचे पिल्लू जिवंत अवस्थेत सापडले. सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे व वनक्षेत्रपाल के. एन. कंधारे यांना माहिती मिळाली व त्यांनी अस्वल व पिल्लू राजगड वनआगारात आणून पंचनामा केला.
१२ फेब्रुवारी रोजी मोहपूरचे पशुधन अधिकारी डॉ. सोनारीकर यांनी शवविच्छेदन केले. अस्वलाच्या पिल्लाला निवारा केंद्र नागपूर येथे पाठविण्यात येणार असल्याचे नाळे यानी सांगितले. अस्वलाच्या मृत्यूचे नेमके कारण काय असावे? हे कळायला मार्ग नाही. मात्र तोंडाला मार लागल्याने हा मृत्यू झाला असावा, असे डॉ.सोनारीकर म्हणाले.
किनवट तालुक्यात सध्या अस्वल वनविभागासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. घोगरवाडी येथे अस्वलाने एका आदिवासी इसमावर हल्ला करून ठार केले आणि अस्वलही मरण पावले. त्यानंतर २० जानेवारी रोजी रात्री अंबाडी गावात चक्क अस्वलाने साडेतीन तास मुक्काम ठोकला होता. त्याला हुसकावून लावण्यात वनविभागाला यश आले. दुसºया दिवशी मांडवी वनपरिक्षेत्रात पळशी येथे एका घरात घुसून बसलेल्या जखमी अस्वलाला वनविभागाने पिंजºयात पकडून नागपूरला हलविले. त्यानंतर चौथी अस्वलाची घटना सिंदगी जंगलात ११ रोजी घडली. त्यात सहा ते आठ वर्षे वयाचे मादी अस्वल मृतावस्थेत तर पिल्लू जिवंत आढळून आले.