महाराष्ट्र राज्य होमगार्डच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर जिल्हा कार्यालय उभारून होमगार्ड भरती करून त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याचे काम या कार्यालयाद्वारे केले जाते. जिल्ह्यात असलेल्या १६१६ होमगार्डपैकी २०२ महिला होमगार्ड आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश होमगार्डच्या मानधनाचा तिढा सुटलेला नाही. मागील पंधरा महिन्यांपासून अनेकांचे मानधन रखडले आहे. जिल्हा कार्यालय अथवा महासमादेशक महाराष्ट्र राज्य होमगार्ड कार्यालय यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु शासनाने निधी उपलब्ध करून दिला नसल्याने मागील पंधरा महिन्यांचे अनेकांचे बिल थकीत आहेत. त्यात काहीजणांना कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला मिळाला आहे. यात त्यांची ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांची बिले थकली आहेत.
चौकट
होमगार्ड यांना दिवसभर ड्युटी केली तर ६७० रुपये मानधन मिळते. महिन्याकाठी १८ ते २० हजार रुपये मानधन मिळते. परंतु आजघडीला कामे कमी झाल्याने मानधनही कमी झाले आहे. महिन्यातील काही दिवसच बंदोबस्त, यात्रा, सण, उत्सव आणि कायदा व सुव्यवस्था निमित्ताने ड्युटी लागते. त्यामुळे निश्चित असे मानधन नाही.
जिल्ह्यातील होमगार्डचे मानधन हे शासनाने दिलेल्या निधीतून केले जाते; परंतु शासनस्तरावर मानधनाचा प्रश्न रेंगाळला आहे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई कार्यालयातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच मानधनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे वाटते.
- भगवान शेट्टे, प्रशासक अधिकारी, जिल्हा होमगार्ड कार्यालय, नांदेड
मानधन अथवा ड्युटी निश्चित नसल्याने आमचं जीवनही स्थिर नाही. शासनाने होमगार्डचे वेतन निश्चित आणि फिक्स करायला हवे. - बालाजी गोडबोले, नांदेड
वेळेवर मानधन मिळत नसल्याने हाती लागेल ते काम करून संसाराचा गाडा हकावा लागत आहे. पोलिसांच्या सोबतीने खांद्याला खांदा लावून काम करत असताना मानधन वाढविणे गरजेचे आहे.
- अब्दुल मुखीद, नांदेड
महिन्यातुन किती दिवस ड्युटी लागेल हे सांगता येत नाही; परंतु बंदोबस्त, सण उत्सव काळात काम लागते. होमगार्ड तसेच इतर ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करून कुटुंबाचा प्रपंच चालवावा लागतो.
- शेख मोबीन, नांदेड