दुरुस्तीसंबंधी माहिती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:45 AM2019-06-30T00:45:01+5:302019-06-30T00:46:49+5:30

जिल्हा परिषदेच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीसह इतर कामांची माहिती सदस्यांनाच व्यवस्थितपणे दिली नसल्याचा आरोप करत सदस्यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबत आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये गाळेधारकांचा २००९ पासून नवीन करार झाला नाही. याबाबतही बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.

Find out about amendment | दुरुस्तीसंबंधी माहिती मिळेना

दुरुस्तीसंबंधी माहिती मिळेना

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम समिती बैठक जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती तातडीने सुरु करण्याची मागणी

नांदेड : जिल्हा परिषदेच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीसह इतर कामांची माहिती सदस्यांनाच व्यवस्थितपणे दिली नसल्याचा आरोप करत सदस्यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबत आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये गाळेधारकांचा २००९ पासून नवीन करार झाला नाही. याबाबतही बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची बैठक मधुकर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. या बैठकीला जि. प. सदस्य संजय बेळगे, व्यंकटराव गोजेगावकर, साहेबराव धनगे, दशरथराव लोहबंदे, मोनाली पाटील, मनोहर शिंदे उपस्थित होते. बैठकीला कार्यकारी अभियंता मुंढे तसेच मिठेवाड यांचीही उपस्थिती होती. बैठकीमध्ये इमारत दुरुस्तीचा विषय उपस्थित झाला. जिल्हा परिषद इमारतीच्या दुरुस्तीकामाची सविस्तर माहिती बांधकाम समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्याने द्यायला हवी, असा सूर सदस्यांनी लावला. या बैठकीत ग्रामीण रस्ते व जिल्हा रस्ते यांच्या मजबुतीकरणाबाबत १८ कोटी निधी मंजुरीसाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. बांधकाम अहवालाच्या इतिवृत्तामध्ये जि.प. उपकर उत्तर आणि दक्षिण विभाग प्रत्येकी एक कोटी तरतूद असताना दाखविण्यात आलेली नाही. तसेच गट ‘अ’ मध्ये २०१८-१९ या वर्षात शिल्लक निधी १ कोटी २७ लाख रुपये, गट ‘ब’ रस्त्याची विशेष दुरुस्ती २ कोटी ४८ लाख रुपये तर गट ‘क ’ लहान पूल आणि नाल्यांची कामे ३९ लक्ष रुपये, गट ‘ड’ १९ लक्ष रुपये यांचे नियमानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिक्षण विभागाने ३१ मार्च २०१९ रोजी शाळा दुरुस्ती व इतर कामे करण्याकरिता निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु बांधकाम विभागाकडून या कामाचे अंदाजपत्रक तसेच निविदाबाबत विलंब केला जात आहे. ही कामे तातडीने पूर्ण करुन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला सुरुवात करण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी सर्वानुमते बैठकीपुरते सभापती म्हणून राठोड यांची निवड करण्यात आली. बैठकीत तरोडानाका येथील जिल्हा परिषदेच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाला. सदर जागेची मोजणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. मात्र त्यानंतरही सदर मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाकडून पुरेसे प्रयत्न केले जात नसल्याबाबतही या बैठकीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
बैठक गांभीर्याने घ्या
जिल्हा परिषद बांधकाम समितीची बैठक शनिवारी उपाध्यक्षांच्या कक्षामध्ये पार पडली. मात्र या बैठकीची रितसर नोटीस देण्यात आलेली नव्हती. याबरोबरच बैठकीपूर्वी सभेचे इतिवृत्त तसेच सभा अहवालही सदस्यांना दिला गेला नाही. बैठकस्थळीही पुरेसे नियोजन करण्यात आलेले नसल्याने या प्रकाराबाबत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सदर बैठक खाजगी नसून प्रशासकीय नियोजनाची बैठक आहे. त्यामुळे या बैठका गांभीर्याने घ्या, असे या सदस्यांनी सुनावले.

Web Title: Find out about amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.