श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या कृषी विभागाने माहूर तालुक्यातील कृषी दुकानांची तपासणी करून कीटकनाशक कंपनीसह दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी ११ कीटकनाशकांचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांत पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतक-यांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली आहेत़ या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कृषि अधिकारी गजानन हुंडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यातील विविध कृषी दुकानांची तपासणी केली़ यावेळी दोन विक्रेत्यावर रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार उल्लघन केल्याने सिंदखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशी पिकाची पाहणीही यावेळी करण्यात आली़ तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषि अधिकारी यांनी संयुक्तपणे मौजे मुरली, उमरा, लिंबायत, आष्टा शिवारातील शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली़ तसेच शेतक-यांना गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शनही केले.