संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
जिल्ह्यात १२ ते २६ जुलै या कालावधीत सामाजिक अर्थसाहाय्य योजनांच्या नवीन लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. या पंधरवड्यांतर्गत ९ जुलैपर्यंत गावनिहाय तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या बैठका घेऊन मोहिमेची माहिती समजावून सांगितली जाणार आहे. १२ ते १८ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांचे सोशल ऑडिट, मयत व स्थलांतरित लाभार्थी याद्या तयार करणे, नवीन लाभार्थी अर्ज भरून घेणे, सर्व प्रमाणपत्रे देणे यासह गावनिहाय अहवाल तहसील कार्यालयास सादर केला जाणार आहे. १९ ते २५ जुलै या कालावधीत तहसील कार्यालयात बैठका घेऊन लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मंजूर करणे, या बैठकांना सर्व संबंधित तलाठी, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांना बोलावून अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध करून निर्णय घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहेत. २६ जुलै रोजी अर्थात सामाजिक न्याय दिनी मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे आणि त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक ठरणार आहे. या मोहिमेत उपविभागीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने सामाजिक संवेदनशीलता जागृत ठेवून सहभागी व्हावे. स्वयंसेवी संस्थांनीही पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संक्रमणामुळे १ हजार ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.