बोगस खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:55 AM2019-07-14T00:55:49+5:302019-07-14T00:57:38+5:30
जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
नांदेड : जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खतांची निर्मिती करणारे पाच कारखाने आहेत तर लातूर येथेही एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये निर्मित होणा-या खताच्या गुणवत्तेबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अशी तपासणी होत नसल्यान बोगस खतनिर्मितीला चालनाच मिळत आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात दोन खत कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात अशा कारखान्यातून वितरित झालेल्या खताचे काय, असा प्रश्न पुढे आला आहे. हजारो मेट्रीक टन बोगस खत आज शेतकºयांच्या माथी मारण्यात आले आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असून शेतकरी कसेतरी पेरण्या करीत आहेत. या पेरणीनंतर शेतक-यांना मिश्र खतांची गरज असते. हे मिश्र खत मातीमिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात पारसेवार अॅग्रो प्रा.लि. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताचा दर्जा तपासण्यासाठी कृषि विभागाने तो संबंधित विभागाकडे पाठविला होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच खताची विक्री सुरू होती़
नामांकित कंपन्यांचीच मिश्र खते वापरावीत
शेतक-यांनी मिश्र खते घेताना केंद्र सरकारच्या नियंत्रणातील नामांकित कंपन्याचेच मिश्र खते वापरणे सद्य-स्थितीत आवश्यक आहे. स्थानिक कारखान्यात मिश्र खतामध्ये ज्या प्रमाणात रासायनिक घटकांची गरज असते ती घटक उपलब्ध नसल्याचे आढळून येत आहे. यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच पण शेतीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. शेतक-यांनी मिश्र खते खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कानवडे यांनी केले आहे.