बांबू लागवडीच्या व्यावसायिक उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठी संधी- पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:04+5:302021-06-16T04:25:04+5:30

जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी या उद्देशाने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मंगळवारी झालेल्या बांबू व ...

Great opportunity for farmers through commercial production of bamboo cultivation- Guardian Minister | बांबू लागवडीच्या व्यावसायिक उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठी संधी- पालकमंत्री

बांबू लागवडीच्या व्यावसायिक उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठी संधी- पालकमंत्री

Next

जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी या उद्देशाने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मंगळवारी झालेल्या बांबू व रेशीम लागवड कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेच्या माध्यमातून बांबू लागवडीसंदर्भात होणारी चर्चा व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. येथे उपस्थित असलेले कृषी, वन व महसूल मनरेगा विभागातील अधिकारी-कर्मचारी हे मार्गदर्शन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकूण नद्यांची संख्या त्यांचे खोरे-काठ विचारात घेतले तर नदी-नाल्याच्या काठावर बांबू लागवडीला शेतीव्यतिरिक्त मोठी संधी आहे. विशेषत: सामाजिक वनीकरणांतर्गत उपलब्ध असलेल्या जमिनीवर बांबूची लागवड करता करता येईल. यादृष्टीने संबंधित विभागाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काळाची गरज लक्षात घेऊन बांबू लागवडीचे महत्त्व माजी आमदार पाशा पटेल यांनी विषद केले. मनुष्याला भविष्यात जगायचे असेल तर बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यापासून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर मिळते आणि आज जी ऑक्सिजनची परिस्थिती निर्माण झाली आहे ती भविष्यात होणार नाही. यासाठी त्यांनी गोमाखोरे चळवळ सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये अंदाजे जवळपास १ हजार एकरवर बांबूची लागवड केली जाईल, याबाबतचे लक्षांक सर्व तालुक्यांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यात पाऊस चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही कार्यशाळा अतिशय योग्य वेळी घडवून आणलेली आहे. जिल्ह्यामध्ये डोंगराळ परिसर मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी व ग्रामपंचायतीमार्फत बांबू लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येईल, असे सांगितले.

सध्या ऑक्सिजनची जी कमतरता भासत आहे तेसुध्दा बांबू लागवडीपासून दूर होऊ शकते. वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते, तसेच शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभदेखील होऊ शकतो. या सर्व बाबीचे महत्व प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे संजीव करपे यांनी विशद केले.

प्रास्ताविकात शेतकऱ्यांनी बांबूची लागवड का करावी याबाबतचे महत्त्व विषद करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, माजी आमदार पाशा पटेल, संजीव करपे, संदीप माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन केले.

प्रभारी रेशीम विकास अधिकारी डॉ. सी.बी. लटपटे, प्र. उपवनसंरक्षक एम.आर. शेख, रेशीम विकास अधिकारी आरती वाकुरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, वनविभागाचे व रेशीम विभागाचे सर्व अधिकारी तसेच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Great opportunity for farmers through commercial production of bamboo cultivation- Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.